Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी अत्यंत धक्कादायक ठरला. या निवडणुकीत महाविकास आघडीला अपेक्षाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. यातच शरद पवार गटातील मोठे नेते राजेश टोपे यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली. राजेश टोपे हे घनसावंगी येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शिंदे गटाने त्यांच्याविरोधात उधन हिकमत बलिराम यांना उमेदवारी जाहीर केली होती, ज्यांनी अवघ्या २ हजार ३०९ मतांनी राजेश टोपे यांना पराभवाची धुळ चाखली. राजेश टोपे यांचा पराभव शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, घनसावंगी मतदारसंघात सर्वाधिक मत शिंदेंच्या उधन हिकमत बलिराम यांना मिळाली. त्यांना एकूण ९८ हजार १९६ मते पडली. तर, राजेश टोपे यांना ९६ हजार १८७ मत मिळाली. बलिराम आणि टोपे याच्यांत फक्त २ हजार ३०९ मतांचा फरक दिसून आला.
घनसावंगीमध्येही मराठा समाजाची संख्या मोठी असून सुमारे ३२ टक्के मतदार आहेत. टोपे, उधान, घाडगे हे सर्व मराठा असल्याने त्यांची मते विभागली जाऊ शकतात, असे मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. सत्ताविरोधी लहरीला सामोरे जावे लागत असले तरी विरोधकांमधील मतविभागणीचा फायदा टोपे यांना होऊ शकतो, असे ते म्हणाले. मात्र, निकालात याउटल चित्र पाहायला मिळाले. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांनी उधन यांचा पराभव केला होता.
महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि यंदाच्या हंगामात कच्च्या कापूस व सोयाबीनला मिळणारा अपुरा भाव यामुळे जनता कंटाळली आहे. मतदार चांगल्या भविष्यासाठी लढत आहेत आणि परिवर्तनासाठी तळमळत आहेत, याचे प्रतिबिंब निवडणूक निकालात उमटणार आहे, असा अंदाज अनेक नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला होता. पण निकाल त्याउलट लागले. भाजप जनतेची फसवणूक करत आहे. तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी भाजपने लाडकी बहीण योजना का सुरू केली नाही, असा सवाल इंडिया आघाडीतील नेते उपस्थित करत आहेत.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत होती. लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, आता राज्यात कुणाची सत्ता स्थापन होणार? हे जवळपास निश्चितच झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, जनतेने महायुतीला निवडल्याचे दिसून येत आहे.