Maharashtra Assembly election results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. या निवडणुकीत आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल हाती आले आहेत. दरम्यान, सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या महायुतीच्या बहुतेक उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. याच पाश्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावा लागले. पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तर, त्यांच्यासमोर भाजपच्या अतुल भोसले यांचे आव्हान होते. जे मतमोजणी सुरू झाल्यापासूनच आघाडीवर होते.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा नेहमीच प्रभाव राहिला आहे. काँग्रेसने येथून सात वेळा विजय मिळवला आहे. मात्र, यावेळी भाजपच्या अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. अतुल भोसले यांना एकूण १ लाख ३७ हजार २८९ मत मिळाली. तर, पृथ्वीराज चव्हाण यांना एकूण ९८ हजार ७४४ मत पडली म्हणजेच त्यांचा ३८ हजार ५४५ मतांनी पराभव झाला. कराड दक्षिण मतदारसंघातून एकूण ८ जण निवडणूक लढवत असून पृथ्वीराज चव्हाण हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत बहुमत मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या 'एक है तो सेफ है' या घोषणेचे श्रेय त्यांनी शनिवारी दिले. तसेच राज्यात सत्ता राखण्यासाठी भगवा आघाडी सज्ज झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तर, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना' या त्यांच्या प्रमुख उपक्रमामुळे विधानसभा निवडणुकीचा कल महायुतीच्या बाजूने लागल्याचे स्पष्ट केले आहे.राज्यातील जनतेने कल्याणकारी योजनांना आपल्या मताने प्रतिसाद दिला. आमच्या विकासाच्या प्रयत्नांमुळे समाजातील प्रत्येक घटकाने आम्हाला मतदान केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत होती. लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, आता राज्यात कुणाची सत्ता स्थापन होणार? हे जवळपास निश्चितच झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, जनतेने महायुतीला निवडल्याचे दिसून येत आहे