ज्यांच्या जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही; निकालानंतर एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ज्यांच्या जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही; निकालानंतर एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

ज्यांच्या जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही; निकालानंतर एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

Published Nov 23, 2024 12:40 PM IST

Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं आहे.

निकालानंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
निकालानंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान

Maharashtra Election results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आला असून महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं पुढचे मुख्यमंत्री कोण यावर आता चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आता मोठं विधान केलं आहे. ज्यांच्या जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स वाढला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महायुतीला २०० च्या वर जागा मिळाल्या असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ५० हून अधिक जागांवर यश मिळालं आहे. या निकालावर एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी विजयाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. 'हा डोंगराएवढा विजय आहे. आमचा मोठा विजय होईल असा विश्वास मी आधीच व्यक्त केला होता. लाडक्या बहि‍णींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. लाडके भाऊ, लाडके शेतकरी या सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवला. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो, असं शिंदे म्हणाले.

'समाजातील प्रत्येक घटकानं महायुतीला भरभरून मतदान केलं. गेल्या अडीच वर्षांत आम्ही जी कामं केली, त्या कामाची ही पोचपावती आहे. त्याबद्दल मतदारांना त्रिवार वंदन, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय एकमतानं होईल!

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल आणि ते देवेंद्र फडणवीस असतील असं भाजपकडून सांगितलं जात आहे. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री असं काही आमच्यात ठरलेलं नाही. निकालाची सगळी आकडेवारी समोर आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ. ज्या पद्धतीनं आम्ही एकदिलानं निवडणूक लढलो, त्याच पद्धतीनं पुढचा निर्णय घेऊ, असं शिंदे म्हणाले.

आदित्य ठाकरेंना टोला

वरळीतील मतदारसंघात आदित्य ठाकरे हे पिछाडीवर गेले असल्याकडं एकनाथ शिंदे यांचं लक्ष वेधलं असता ते म्हणाले, ‘अडीच वर्षे ते आरोप करत राहिले. आम्ही आरोपांना उत्तर देण्याऐवजी काम करत राहिलो. आता तरी त्यांनी आत्मपरीक्षण करावं.'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर