Kolhapur South Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारून २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. महायुतीने राज्य़ातील सत्ता कायम राखली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही महाआघाडीला जबर हादरा बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील निकाल हळुहळु समोर येत असूनराज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी २०१९ च्या पराभवाचा वचपा काढत आमदारकी पुन्हा खेचून आणली आहे. येथे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव झाल्याने सतेज पाटलांना मोठा धक्का बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला निकाल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा पार सुपडासाफ झाला असून महायुतीने पहिल्यांदाच इतका मोठा विजय मिळवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १० पैकी ९ जागांवर महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचे कोल्हापुरातील निकाल सतेज पाटील यांना मोठा धक्का मानले जात आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला असून भाजपचे अमल महाडिक यांनी पुन्हा आमदारकी खेचून आणली आहे.
महाविकास आघाडीमधील जागावाटपात सतेज पाटील यांनी बाजी मारत पाच जागा खेचून आणल्या होत्या. मात्र त्या सर्वच जागांवरील उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. प्रचारादरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहीण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्यात आलं होतं. त्याचा फटका अमल महाडिक यांना बसण्याची शक्यता वर्चवली जात होती, मात्र कोल्हापूर दक्षिणच्या निकालावर याचा काहीच परिणाम न झाल्याचे दिसून आले आहे. कोल्हापुरात प्रियंका गांधी यांची सभा होऊनही जिल्ह्तील सर्वच काँग्रेस उमेदवार पिछाडीवर पड़ले आहेत.
कोल्हापूर दक्षिणची लढाई राज्यात चर्चेत आली होती. खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या संघर्षामुळे हा लढत हायव्होलटेज बनली होती. सतेज पाटील यांची प्रतिष्ठा या मतदारसंघांमध्ये पणाला लागली होती. मात्र लाडकी बहीण योजना, योगी आदित्यनाथ यांची सभा कोल्हापूर दक्षिणच्या निकालामध्ये महत्त्वपूर्ण ठरल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असतानाही य़ा निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली आहे. २०१९च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कोल्हापूर दक्षिण,कोल्हापूर उत्तर,करवीर व हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय खेचून आणला होता. यावेळी हे सर्व मतदारसंघ काँग्रेस गमावताना दिसत आहे.