Maharashtra Election Result Thane District : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि अन्य राजकीय पक्षांची चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.राजकीय पक्षांच्या आघाडीबाबत बोलायचं झालं तर, भारतीय जनता पक्ष (भाजप) या निवडणुकीत ८ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने ठाणे, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, ऐरोली आणि बेलापूर या मतदारसंघांमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. या क्षेत्रांमध्ये भाजपच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून, पार्टीने अनेक प्रकल्पांची घोषणा केली आहे, ज्यामुळे मतदारांमध्ये उत्साही प्रतिसाद मिळाला आहे.
शिवसेना शिंदे गटाने ६ मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. या गटाने कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ या मतदारसंघांमध्ये बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सामान्यांच्या प्रश्नांना उचलून धरत त्यावर अनेक उपक्रम राबवले. याशिवा स्थानिक विकास प्रकल्पांचे वचन दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शहापूर अ.ज. मतदारसंघात आघाडी घेतली आहे. अर्थात आता ठाणे जिल्ह्यातील एकूण १८ जागांपैकी १४ जागांवर महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे.
तर, शरद पवार गटाने मुंब्रा कळवा मतदारसंघात आपले सामर्थ्य दाखवले आहे. काँग्रेसने मिरा भाईंदरमध्ये आपली आघाडी कायम ठेवली आहे.समाजवादी पार्टीने भिवंडी पूर्व मतदारसंघात आपली ताकद सिद्ध केली असून, त्यांनी या भागात मजबूत निवडणूक प्रचार केला आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट देखील आपापल्या मतदारसंघांमध्ये चांगला प्रतिसाद मिळवताना दिसत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील या राजकीय लढतीत विविध पक्षांनी आपापली ताकद दाखवली असून, निवडणुकीचे निकाल आणि त्या अनुषंगाने होणारी राजकीय समीकरणे ही भविष्यात महत्त्वपूर्ण ठरतील. मतदारसंघनिहाय व पक्षनिहाय स्थिती पाहता, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चुरस वाढलेली आहे आणि सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांचे वचन देत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे.