महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वच एक्झिट पोलचे अंदाजचुकले असून महायुतीची सुनामी आली आहे. १२४ जागा जिंकूनभाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. जागांच्या बळावर भाजपाचा मुख्यमंत्री होणार की महाराष्ट्रात बिहार मॉडेल वापरले जाणार, असा प्रश्न पडू लागला आहे. बिहारमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार असले तरीही ज्यांच्या नेतृत्वात सरकार आले त्या नितीशकुमारांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आले होते. यानुसार महाराष्ट्रातही शिंदेंच्या नेतृत्वात सरकार आले म्हणून पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री केले जाण्याची देखील शक्यता आहे. त्यातच शिंदे यांनी ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे काही ठरले नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. भाजप १२४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना ५५ जागांवर तर राष्ट्रवादी ३६ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट होताच आता मुख्यमंत्रिपदावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. दरम्यान, महाराष्ट्राची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असल्याचे शिवसेनेकडून बोलले जात आहे. आता सर्वांच्या नजरा भाजपच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
भाजपच्या पुढील वाटचालीचा अंदाज बांधण्याआधी २०२० च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे गणित समजून घेणे गरजेचे आहे. त्यावेळी कमी जागा मिळूनही भाजपने नितीशकुमार यांचे नेतृत्व स्वीकारले होते. त्या निवडणुकीत भाजपला ७४ तर नितीशकुमार यांच्या जदयूला केवळ ४३ जागा मिळाल्या होत्या. असे असतानाही भाजपने नितीशकुमार यांचे नेतृत्व स्वीकारले होते.
भाजपला यावेळी राष्ट्रीय राजकारणात एक संदेश देण्याची संधी आहे, ज्यात ते युतीच्या राजकारणावर मोठं मन दाखवतात. केंद्रात सध्या भाजपचे आघाडी सरकार आहे. अशा वेळी जास्त जागा मिळाल्यावर आपली भूमिका बदलते, असा संदेश त्यांना द्यायचा नाही.
भाजपसाठी महाराष्ट्रातील परिस्थिती बिहारपेक्षा वेगळी आहे. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या दर्जाचा चेहरा नव्हता. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा राज्याची कमान आणि भाजपची कमान सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा मोठा आहे. अशा स्थितीत भाजपला सत्ता काबीज करण्याची मोठी संधी आहे.