Maharashtra CM : एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; भावी मुख्यमंत्री कोण? ‘या’ ३ फॉर्म्युल्यांची जोरदार चर्चा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra CM : एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; भावी मुख्यमंत्री कोण? ‘या’ ३ फॉर्म्युल्यांची जोरदार चर्चा

Maharashtra CM : एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; भावी मुख्यमंत्री कोण? ‘या’ ३ फॉर्म्युल्यांची जोरदार चर्चा

Nov 26, 2024 12:07 PM IST

Mahayuti CM formula : मुख्यमंत्रीपदासाठी २-२-१ अशाही फॉर्म्युलाची चर्चा सुरू आहे. यानुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते.

एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता
एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता

महायुतीने विधानसभा निकालात २३५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले असून महाविकास आघाडीचा पार सुपडासाफ केला आहे. महाविकास आघाडीला पुढील पाच वर्षापर्यंत सत्ता दूरदूरपर्यंत दिसत नाही. मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महाराष्ट्राचानवीन मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता कमालीची वाढलीआहे. त्यातच विविध चर्चांना सोमवारी उधाण आल्याचे दिसून आले. पुन्हा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस की आणखी कोणी? याची चर्चा रंगली आहे. त्यातच आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर राज्यपाल त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करू शकतात.

मुख्यमंत्रिपदाबाबत विविध तर्क दिले जात आहेत. भाजपला १३२ जागा मिळाल्या असूनचार सहयोगी पक्षांच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तसेच चार अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपचं संख्याबळ १४० झालं आहे.भाजपकडे इतके मोठे संख्याबळ असताना मुख्यमंत्रिपद फडणवीसांनाच मिळेल, अशी सर्वाधिक चर्चा आहे. त्यातच फडणवीसांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम ठेवावे, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. त्यातच एक नवी माहिती समोर आली आहे. त्यानुसार महायुतीकडून मुख्यमंत्रि‍पदासाठी १-४ चा फॉर्म्युला अंमलातआणला जाऊ शकतो. या फॉर्म्युलानुसार एकनाथ शिंदे यांना पुढील एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले जाऊ शकते. त्यानंतरची चार वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

मराठा आरक्षण आंदोलन व मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याने त्यांची मराठाविरोधी तयार झालेली प्रतिमा आगामी काळात भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. तसेच शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवणे मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्य़ेही भाजपला घातक ठरू शकते. यामुळे निवडणुका संपेपर्यंत १ वर्ष एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवले जाऊ शकते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सुत्रे दिली जाऊ शकतात,अशी चर्चा आहे.

तसेच २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्य़ा कार्यकाळात मुंबई महापालिकेत भाजपने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या कारणासाठी त्यांना मुख्य़मंत्रीपदापासून दूर ठेवले जाण्याची शक्यता कमी आहे. फडणवीसांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी राहून निवडणुकीत आपले योगदान देऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

अजित पवारांचेही मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न होणार पूर्ण?

२-२-१ अशाही फॉर्म्युलाची चर्चा सुरू आहे. यानुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते. यानुसार पहिल्या चार वर्षासाठी अनुक्रमे २-२ वर्षे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते तर शेवटच्या एक वर्षासाठी अजित पवारांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते. अशीही चर्चा आहे.

Whats_app_banner