Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एकतर्फी निकालाचा राजकीय पक्षांसह त्यांच्या उमेदवारांना व समर्थकांना धक्का बसला आहे. अनेकांनी सत्ताधाऱ्यांवर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे. मनसेचे दहिसर विधानसभेचे उमेदवार राजेश येरुणकर यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘माझी आई आणि बायकोनंही मला मत दिलं नाही असं कसं होईल’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी येरुणकर यांचा हा व्हिडिओ एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात येरुणकर हे निवडणूक यंत्रणेबाबत व ईव्हीएममधील घोळाबाबत तक्रार करताना दिसत आहेत.
'मतमोजणी सुरू असतानाच आमच्या प्रतिनिधींना ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचं निदर्शनास आलं. प्रत्येक मशीनला ३ सील असतात. पण एका मशिनला एकच सील होतं. त्याबाबत विचारलं असता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं त्याकडं दुर्लक्ष केलं. एखाद्या मशीनला एक सील असू शकतं, असं तो अधिकारी म्हणाला. मशिनच्या चार्जिंगबद्दलही शंका आहेत. काही मशिन ९९ टक्के चार्ज होत्या. काही ७० टक्के तर काही ६० टक्के चार्ज होत्या. दोन दिवसांपूर्वी सील केलेली मशिन ९९ टक्के चार्ज कशी असू शकते, असा प्रश्न येरुणकर यांनी केला.
‘इतक्या वर्षांपासून राजकारणात आहे. प्रत्येक यादीत मला दोन-दोन, चार-चार मतं मिळाली आहेत. हे कसं शक्य आहे? ज्या वॉर्डमध्ये आम्ही राहतो, तिथं मला दोन-दोन मतं मिळालीत. माझ्या घरात चार मतं आहेत, असं असताना मला दोन मतं मिळाली. याचा अर्थ माझी आई, माझी बायको किंवा माझ्या मुलीनं मला मतदानच केलं नाही का, असा संताप येरुणकर यांनी केला. ‘प्रचाराला फिरत असताना प्रत्येक माणूस म्हणत होता की यावेळी बदल करायचा आहे. विद्यमान आमदाराला आम्ही कंटाळलोय. ते आम्हाला नको आहेत. आम्हाला बदल करायचा आहे. मग ही मतं गेली कुठं,’ अशी विचारणाही येरुणकर यांनी केली.
'हेच होणार असेल तर निवडणुका घेणंच बंद करून टाका. आयएएस अधिकारी काही ऐकूनच घेत नाहीत. गणपत पाटील नगरमध्ये अजिबात कामं झालेली नाहीत, तिथं भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळते. एका वॉर्डमध्ये तर उमेदवाराला येऊच दिलं नाही तरी त्यांना तिथं आघाडी मिळाली. असं कसं होऊ शकतं? हेच करायचं तर कशाला निवडणुका घेऊन लोकांचे पैसे वाया घालवता. पोलिसांचा सर्रास गैरवापर सुरू आहे, असा आरोप मनसेच्या पोलिंग एजंटनं केला.