Devendra Fadnavis mother reaction on win : महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या मतमोजणीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. महायुती बहुमताच्या खूप पुढे गेली असून, आता राज्यात पुढचे सरकारही महायुतीचेच स्थापन होणार आहे. आता महायुतीच्या या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. या विजयाबद्दल एकीकडे राहुल नार्वेकर यांनी महायुतीचे अभिनंदन केले आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या आईनेही या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री केले जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. भाजपचे अध्यक्षही त्यांना भेटायला आणि शुभेच्छाही द्यायला आले आहेत.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होताच उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले असून, आशीर्वादही दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस म्हणाल्या की, ‘हा खूप मोठा दिवस आहे, कारण माझा मुलगा राज्यातील मोठा नेता झाला आहे. तो२४तास अथक परिश्रम करत असतो. या काळातही तो अजिबात घरात दिसला नाही. ना जेवण ना आराम, सतत पायाला भिंगरी लावून मतदार संघात फिरण्याचे काम सुरू होते. दिवसरात्र तो जनतेची सेवा करत होता. त्यातच त्याला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद देखील मिळाला. पण, ही योजना नसती, तरी देवेंद्र जिंकला असता. त्याने खूप मेहनत घेतली होती. तोच मुख्यमंत्री होणार असा माझा विश्वास आहे. प्रिय बहिणींनी देखील त्यांना आशीर्वाद दिला आहे.’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं आहे, आणि भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ‘एक है तो‘सेफ’ है! मोदी है तो मुमकिन है!’ असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
राज्याच्या राजकारणात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन केले जात आहे. सध्या महायुती २२० जागांवर आघाडीवर आहे, त्यापैकी १२६ जागांवर भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला केवळ ५० जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे.या निवडणुकीच्या निकालांनी महायुतीला प्रचंड विजय मिळवून दिला आहे आणि भाजपच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.