raj Thackeray dombivali rally : महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार यांनी सुरुवात केली. पण आता केवळ फोडाफोडी करून भागत नाही. तर संबंधित पक्षावरच दावा ठोकून पक्ष काबीज करण्याचा नवा पायंडा पाडला जात आहे, असे राजकारण मी कधी बघितले नव्हते. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही उद्धव ठाकरेंची जशी प्रॉपर्टी तशी ती एकनाथ शिंदे यांचीही नाही आणि राष्ट्रवादी पक्ष ही अजित पवार यांची प्रॉपर्टी नाही, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दोघांनाही खडेबोल सुनावले.
दिवाळी झाल्याबरोबर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचार सभांना सुरुवात केली आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात पहिली प्रचारसभा घेत महायुती तसेच महाआघाडीतील नेत्यांवर जोरदार घणाघात केला. या सभेत राज ठाकरेंनी अजित पवार व एकनाथ शिंदे यांना सुनावले. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह जशी उद्धव ठाकरे यांची प्रॉपर्टी नाही तशी ती एकनाथ शिंदे यांचीही नाही. माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी ही प्रॉपर्टी अजित पवार यांची नाही. राष्ट्रवादी हे अपत्य शरद पवार यांचे आहे. शिंदे आणि अजित पवार यांनी हे लक्षात ठेवावे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात असला घाणेरडा प्रकार मी पाहिला नव्हता, असेही राज म्हणाले.
राज म्हणाले मला, आज आत्ताच कुणीतरी एक क्लिप पाठवली. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच प्रचारसभेच्या व्यासपीठावर एका भोजपुरी गाण्यावर बाई नाचतेय. लोक जमण्याआधी लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून एक बाई नाचतेय. तेही कुठल्यातरी भोजपुरी गाण्यावर नाचतेय. ज्या व्यासपीठावर एकनाथ शिंदेंचा फोटो आहे, संबंधित उमेदवाराचं नाव आहे, त्यावर एक महिला भोजपुरी गाण्यावर नाचतेय. ही लाडकी बहीण योजना? असा सवाल करत, ज्या शिवछत्रपतींनी एवढे राज्य उभे केले, एवढा मान उभा केला, अटकेपार झेंडे फडकावले आपल्या मराठे शाहीने. हा इतिहास सांगणारा आमचा महाराष्ट्र आणि आम्ही व्यासपीठावर मुली नाचवतोय? अशा शब्दात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला.
प्रचाराचा नारळ फोडताच राज ठाकरेंनी बंधू उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. फक्त मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी मतदारांच्या मतांची प्रतारणा केली. त्यांनी स्वार्थासाठी वेगळ्या विचाराचा आघाडीसोबत साठगाठ बांधत आपलं हिंदुत्व संपवल्याची टीका राज ठाकरेंनी केली.आघाडीसोबत जाताच हिंदुत्व गेल्याचं टीका राज ठाकरेंनी या सभेत केली.
उद्धव काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर सगळ्या फोटोवरून आणि बॅनरवरून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोरील हिंदू हृदयसम्राट हे काढून टाकण्यात आलं. इतकेच नाही तर शिवसेनेच्या कार्यक्रमातील बॅनरवरही बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदू हृदयसम्राट हे लिहिलं जात नव्हतं. काही ठिकाणी तर ऊर्दू होर्डिंगवरती बाळासाहेबांच्या नावापुढे ज़नाब हे लिहिलं जात होतं. स्वत:च्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी पातळी सोडल्याची टीका राज ठाकरेंनी केली.