महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असून जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आज भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य भाजप नेते उपस्थित होते. अमित शहा यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. शहांची पत्रकार परिषद सुरू असतानाच एका व्यक्तीने उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली वगोंधळ घातला. हा व्यक्ती वाढती महागाई आणि बेरोजगारीवरुन शहा यांना विरोधकरत होता. अचानक घडलेल्या या प्रकाराने यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर या व्यक्तीला भाजपा कार्यकर्त्यानी ढकलत हॉलच्या बाहेर काढल्याने पुढील गोंधळ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत अमित शहा यांची पत्रकार परिषद सुरु असताना व भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जात असताना पत्रकारांमध्ये उपस्थित असलेला एक व्यक्त उभा राहिला वत्याने वाढती महागाई, गॅस सिलेंडरचे वाढते दर आणि बेरोजगारीवरुन विरोध केला. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला, मात्र कार्यकर्त्यांनी त्याला ढकलत सभागृहाबाहेर नेले. हा व्यक्ती उत्तरप्रदेशमधील कानपूरचा रहिवाशी असल्याचे समजते.
भाजपच्या ज्या संकल्पपत्राचं लोकार्पण झालं ते महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब आहे. महाराष्ट्र अनेक युगापासून देशाचं नेतृत्व करत आला आहे. भक्ती आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. जेव्हा गरज पडली तेव्हा गुलामीतून मुक्तीचं आंदोलन शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली. सामाजिक क्रांतीची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली,असं अमित शहा याप्रसंगी म्हणाले.
आमच्या संकल्पपत्रात मजबूत महाराष्ट्र कसा होईल, हे पाहिलं आहे. निवडणुकीत आमचा मुकाबला आघाडीशी आहे. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांना विचारधारेशी देणं घेणं नाही, ही विकासविरोधी आघाडी आहे, असं म्हणत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान,गरीबांचं कल्याण करण्याचं म्हटलंय. आम्ही महिलांचा सन्मान करण्याचं आश्वासन दिलं आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय वेगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काय श्रद्धांजली असू शकते.
यावेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं की, सावरकरांबद्दल राहुल गांधीना दोन शब्द चांगले बोलायला सांगाल का. काँग्रेसच्या नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल दोन शब्द बोलायला सांगाल का. मी उद्धव ठाकरेंना विनंती करतो त्यांनी राहुल गांधींकडून सावरकरांबाबत चांगलं बोलून दाखवावं.