राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असतानाच मालेगाव मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालेगाव विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार व विद्यमान आमदार मुफ्ती इस्माईल यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. निवडणूक प्रचार करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मालेगाव मतदारसंघातील एमआयएम उमेदवार आमदार मुफ्ती इस्माईल यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तत्काळ जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मुफ्ती इस्माईल यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जात असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या दोन ते तीन वाहिन्यात ब्लॉककेज असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. हॉस्पिटलमध्ये सध्या मुफ्ती इस्माईल यांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. रुग्णालय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इस्माईल यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
मुफ्ती इस्माईल यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती समजताच त्यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आणि त्यांच्या विरुद्ध आता निवडणुकीत उभे असलेले माजी आमदार आसिफ शेख हॉस्पिटलमध्ये पोहोचले. विरोधकांकडूनही इस्माईल यांच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे.
मुफ्ती इस्माईल अब्दुल खालिक एक इस्लामिक विद्वान आणि मालेगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. ते दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. ते मालेगाव सेंट्रल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा जन सुराज्य शक्ति पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते २०१९ मध्ये AIMIM मध्ये गेले व निवडणूक जिंकले. सध्या ते मालेगाव मध्य मतदारसंघाचे आमदार आहेत. त्याचबबरोबर ते जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेचे महासचिव आहेत.