Maharashtra Election Mahim Seat:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना माहीम मतदार संघातून जबरदस्त पराभवाचा सामना करावा लागला आहे. आदित्य ठाकरे यांच्यानंतर ठाकरे कुटुंबातून निवडणुकीत उतरणारे अमित हे दुसरे सदस्य होते. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा माहीमच्या मतदारसंघाच्या निकालाकडे लागल्या होत्या. माहीममधून शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून महेश सावंत हे दोन उमेदवार रिंगणात असल्याने या ठिकाणी चुरशीची तिरंगी लढत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. यातच सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे असा सामना रंगेल, अशी चिन्हदेखील होती. मात्र, या दोघांच्या चर्चेत महेश सावंत यांनी बाजी मारत माहीमच्या मतदार संघातून विजय मिळवला आहे.
२०१९मध्ये आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता, वरळी मतदारसंघातून ते जिंकूनही आले होते. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ता काळात त्यांनी मंत्रिपद ही भूषवलं. आता २०२४साठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाकरे घराण्यातून अमित ठाकरे हे माहीमच्या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात सत्तेचं राजकारण करण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र, आदित्य ठाकरे यांच्यासाठी जशी पोषक स्थिती निर्माण केली गेली, तशी अमित ठाकरेंसाठी होताना दिसली नाही. सदा सरवणकर या मातब्बर उमेदवाराने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी, यासाठी प्रयत्नही झाले. परंतु, सदा सरवणकर त्यांच्या मतावर ठाम राहिले.
यामुळे सुरुवातीपासूनच ही निवडणूक अमित ठाकरेंसाठी थोडीशी कठीण जाईल, हे निश्चित झाले होते. १६व्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर गेल्याचे चित्र दिसत होते. अमित ठाकरे यांना एकूण२९२५२मतं मिळाली होती. तर, महेश सावंत यांना४३७४७आणि सदा सरवणकर यांना४२७६७मत होती. त्यामुळे अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर गेले होते आणि या तिघांमधली मतांची दरी देखील मोठी होती. त्यामुळे अमित ठाकरे पिछाडीवर पडले असून, त्यांची हार ही निश्चित झाली होती.
‘मी ही निवडणूक सहज जिंकेन. सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचे आव्हान मी मानतच नाही. सदा सरवणकर हे याआधी शिवसैनिकांमुळेच निवडून आले होते. त्यांच्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत घेतली होती’, अशी प्रतिक्रिया महेश सावंत यांनी दिली होती. दरम्यान, सरवणकर आणि ठाकरे यांच्यातील या लढतीचा लाभ महेश सावंत यांना झाला.