Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, यानंतर राज्यातील राजकीय वातावरण गाजत आहे. हा विजय साजरा करत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाविजयावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आणि जनतेने दिलेल्या प्रेमासाठी आभार व्यक्त केले.
अजित पवार म्हणाले, ‘खरी राष्ट्रवादी कोण हे जनतेने ठरवले आहे. यावेळी लोकसभेतील काही चुका आम्ही सुधारल्या आहेत. आमच्या लाडकी बहीण योजनाने या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली. या योजनेनेच गेम चेंजर बनून महायुतीला विजय मिळवून दिला.माझ्या राजकीय कारकिर्दीत युतीला २००हून अधिक जागा मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. विरोधी पक्ष सध्या शून्य झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आम्ही सुधारणा केल्या होत्या, आणि लोकसभा नंतर जे आनंदित होते, तेच आज प्रश्न उपस्थित करत आहेत.’
अजित पवार यांचा विश्वास होता की, ‘महायुतीला दिलेले जनतेचे समर्थन हे या विजयाचे खरे कारण आहे. विरोधी पक्ष गेल्या काही दिवसांत विरोधक आम्हाला लक्ष्य करत होते. पण, त्यांनीच आम्हाला लोकसभा निवडणुकीत घेतलेले धडे शिकवून सुधारण्यासाठी प्रेरणा दिली. त्यातच लाडकी बहीण योजना या निवडणुकीत गेम चेंजर ठरली. यामुळे विरोधक उताणी पडले.’
महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचे मुख्य कारण म्हणत अजित पवार यांच्यासोबत शिवसेना आणि भाजपने ही योजनांवर जोर दिला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या कारकिर्दीवर जोरदार टीका केली. ‘आमच्या योजनांवर चेष्टा केली गेली होती. पण जाहीरनाम्यात काहीही विचार न करता विरोधकांनी आमच्या योजने बदल करून पुढे केल्या. यामुळेच जनतेला त्यांच्या मनातील गोष्टी कळल्या’, असे अजित पवार म्हणाले.
‘महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय लोकांनीच घडवला आहे. या निवडणुकीत लोकांनी आपल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा वर्षाव केला. ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’, ‘लाडका शेतकरी’ या योजनेमुळेच या विजयाची गोडी अधिकच वाढली. गेल्या दोन वर्षांत आम्ही जे काम केले आणि जे ऐतिहासिक निर्णय घेतले, ते अन्य कोणत्याही सरकारने घेतलेले निर्णय असू शकत नाहीत. महाविकास आघाडीने अनेक महत्वाची कामे थांबवली होती, पण आम्ही त्या सर्व कामांना पुन्हा सुरू केले.‘लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ अशा कल्याणकारी योजनांमुळे लोकांना मोठा लाभ झाला. आम्ही फक्त घोषणा केली नाहीत, तर त्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी कटीबद्ध राहिलो. आचार संहितेचा काळ लागू होण्यापूर्वीच आम्ही सर्व लोकांच्या खात्यात पैसे जमा केले. हे एक सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी काम करणारे सरकार आहे. आम्ही लोकांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी कायम कटिबद्ध राहणार आहोत’, असे ते म्हणाले.