महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रचारसभेत आश्वासन दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेतही आरक्षणाचे पडसाद उमटल्याचे दिसले.
पुण्यातील पंतप्रधान मोदींच्या सभेत एका व्यक्तीने आरक्षणाची मागणी केली. मोदींच्या भाषणादरम्यान एकाने घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली. यामुळे सभेत गोंधळ माजला. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीकडे धाव घेत घोषणाबाजी थांबवली.
घोषणाबाजी केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांसहित पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेऊन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीची माहिती समोर येऊ शकली नाही.
महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी केवळ एक आठवड्याचा कालावधी राहिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे दौरे वाढले आहेत. योगींची'बटोगे तो कटोगे' आणि मोदींच्या'एक हैं, तो सेफ हैं' या घोषणांही गाजताना दिसत आहेत. आज पुण्यातील सभेत मोदी म्हणाले की, जर आपण एक राहिलो नाही, तुमची एकजूट तुटली, तर सर्वात आधी काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून घेईल. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहे. समृद्धी कायम राहावी यासाठी आपण एकसंध राहायला हवे. या देशातील १० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. काँग्रेसला त्यांना जातींमध्ये विभाजित करायचे आहे, जेणेकरून ते त्यांना कमकुवत करू शकतील. जर आदिवासी समाजात फूट पडली, तर हे लोक त्यांची ओळखच नष्ट करतील. आरक्षण संपवण्याचे वक्तव्य काँग्रेसच्या युवराजांनी परदेशात केले आहे. हेच त्यांचे कारस्थान आहे. त्यापासून स्वतःला वाचूवायचे असेल तर तुमची एकजूट म्हत्वाची आहे.
मोदी म्हणाले पुण्यातील नागरिकांनी माझ्या स्वागतासाठी रस्त्यांवर गर्दी केली होती. येथील सभेतही गर्दी दिसत आहे. पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. मी तुम्हाला विश्वास देतो, महायुतीचं नवीन सरकार आणखी वेगानं पुण्याच्या विकासासाठी काम करेल, अशी ग्वाही देताना मोदींनी'महाराष्ट्र में फिर एक बार, महायुती सरकार'चा नारा दिला.
मोदी म्हणाले पुण्याला अजून सशक्त करण्यासाठी गुंतवणूक, इंडस्ट्री आणि इन्फ्रास्ट्रक्चर या तीन गोष्टींची गरज आहे. याच्या पैलूवर काम आम्ही चालू केलं असून त्यातून परकीय गुंतवणुकीत वाढ झालीय. महायुतीचं सरकार मोठ्या गतीने काम करेल आणि पुण्याच्या विकासाला नवीन पंख लावेल, असाही विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.