Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे रण तापत असून अनेक नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे देश पातळीवरील बडे नेते येऊन शरद पवारांवर टीका करत असतानाच शरद पवारांनीही पायाला भिंगरी लावून राज्यभरात प्रचारसंभाचा धडाका लावला आहे. परांडामध्ये शरद पवारांनी स्वत: त्यांच्या वयाचा उल्लेख करत महायुतीला मोठा इशारा दिला. सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होत नाही, अशी जोरदार बॅटींग शरद पवारांनी केली.
परांडा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल मोटे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत आहेत. राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार म्हणाले की, ओमराजे (Omraje Nimablar)मला तुमची गोष्ट आजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असे तुम्ही म्हणालात, मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीला दिला आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर,रणजित पाटील उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारची घोषणा केली, कारण त्यांना संविधान बदलायचे होते. मात्र तुम्ही लोकांनी निर्णय हाती घेतला.तुम्ही आम्ही एकत्र झालो आणि महाराष्ट्रातील ४८ खासदांरापैकी ३१ खासदार महायुतीचे निवडून दिले. या निकालामुळे घटना वाचवायचं काम तुम्ही केलं आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा तुमच्या विचाराच्या लोकांच्या हातात पाहिजे. सत्ता हातात आल्यावर लोकांचे प्रश्न सोडवता येतात. महिलांना अधिकार दिले की महिला काहीही करू शकतात. महिलांना संधी देण्यासाठी महालक्ष्मी योजना आणल्याचे शरद पवार म्हणाले.
दुष्काळाला तोंड देणारा, रोजगार हमीच्या कामावर जाणारा तुमच्यासारखा शेतकरी ऊस उत्पादन करतोय. माझा बळीराजा सुखी झाला पाहिजे, त्याच्या घरातील मुले उच्चशिक्षीत झाली पाहिजेत. यासाठी आम्ही काम हातात घेतलं आहे. महाविकास आघाडीचं संघटन उभं केल आहे.