Maharashtra assembly election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणूक २०२४ साठी २८८ मतदारसंघात ७ हजार ७८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील आज (४ नोव्हेंबर) रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत २ हजार ९३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता राज्यात ४ हजार १४० उमेदवार अंतिमत: निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदार संघात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम ३१५ उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या अखेरच्या दिवशी ५३ जणांनी माघार घेतली.
मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आज उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम १०५ उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज दिली. उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या अखेरच्या दिवशी १२ जणांनी माघार घेतली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
धारावी मतदारसंघातून ०३, वरळी मतदारसंघातून ०२, भायखळा मतदारसंघातून ०५ तर कुलाबा मतदारसंघातून ०२ जणांनी अर्ज मागे घेतले.