शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पहिली पसंती? एक्झिट पोल काय सांगतो पाहा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पहिली पसंती? एक्झिट पोल काय सांगतो पाहा!

शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पहिली पसंती? एक्झिट पोल काय सांगतो पाहा!

Nov 20, 2024 10:02 PM IST

Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर निवडणुका पूर्ण झाल्यानंतर, राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल यावर देखील चर्चा केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणून कुणाला किती पसंती जाणून घेऊयात एक्जिट पोलच्या आकडेवारीनुसार.

शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पहिली पसंती ? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पहिली पसंती ? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी

Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात ५८ टक्के मतदान झाले होते. मतदानानंतर सर्वच चॅनल्समधून एक्झिट पोल समोर आले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजपप्रणीत महायुतीचे सरकार असल्याचा दावा केला जात असून महाविकास आघाडीला धक्का बसू शकतो. मात्र, अंतिम निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार असाही प्रश्न सर्वांच्या मनात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण ?त्याचे सर्वेक्षणही पुढे आहे.

काय सांगते आकडेवारी ?

पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, ३५.८ टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणूंन पहिली पसंती दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे आहेत. ठाकरे यांना २१.७ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. देवेंद्र फडणवीस यांना ११.७ टक्के तर अजित पवार यांना २.३ टक्के आणि नाना पटोले यांना १.३ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. इतरांना २७.२ टक्के लोकांनी पसंती दिली.

टाइम्स नाऊने केलेल्या एक्झिट पोलमध्ये देखील मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना पहिली पसंती मिळाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी ३२ टक्क्यांहून अधिक जनतेने शिंदे यांच्यावर मुख्यमंत्री म्हणूंन विश्वास व्यक्त केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर जनतेने भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. चौथ्या क्रमांकावर ७ टक्के लोकांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून विश्वास व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आणि काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे. बहुमतासाठी एका पक्षाला १४५ जागा मिळणे आवश्यक आहे.

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते शिवसेनेचे प्रमुख आहेत. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २००९ साली एकनाथ शिंदे येथून विजयी झाले होते, त्यानंतर ते येथून कधीही पराभूत झाले नाहीत. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशाने महाराष्ट्र निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याची महायुतीला आशा आहे.

देवेंद्र फडणवीस

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी सलग चौथ्यांदा या जागेवरून निवडणूक लढवली. २००९ पासून ते येथील आमदार आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तेव्हा फडणवीस यांच्याकडे भाजप नेतृत्वाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती.

अजित पवार

अजित पवार राष्ट्रवादीचे नेतृत्व करत आहेत. ते सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अजित पवार पुन्हा पुण्याच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले आहेत. गेल्या सात निवडणुका ते येथून जिंकत आले आहेत. यावेळी अजित पवार यांना त्यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्याशी स्पर्धा आहे. या जागेवर शरद पवार यांनीही निवडणूक जिंकली आहे. अजित पवार काका शरद पवार यांच्यापासून फारकत घेऊन महायुतीत दाखल झाले होते.

उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या शिवसेनेचे (UBT) नेतृत्व करत आहेत. ते सध्या विधानपरिषदेत आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना (UBT) महाविकास आघाडीसोबत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने नऊ जागा जिंकल्या होत्या.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर