राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या ऐन रंगात आला आहे. प्रचारासाठी कसाबसा एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने सर्वच उमेदवारांकडून व मोठ्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच मतदारसंघातील उमेदवारांकडून प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे.याचदरम्यान काही उमेदवार आणि राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत.भाजप आमदार बबनराव लोणीकर, खासदार धनंजय महाडिक यांच्यानंतर आता नांदेडमधील भाजप उमेदवाराचं बेताल वक्तव्य समोर आलं आहे.
रोज रोज गावात येऊन काय तुमचे काय मुके घ्यायचे का? असे बेताल वक्तव्यकिनवट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार भीमराव केराम (MLA Bhimrao Keram) यांनी केलं. विशेष म्हणजे केराम यांनी हे विधान केलं त्यावेळी भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे या व्यासपीठावर उपास्थित होत्या. केराम यांच्या प्रचारासाठी काल बोधडी येथे पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केराम यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
गेल्या निवडणुकीपासून आमदार भीमराव केराम गावात फिरकले नाहीत, अशी तक्रार नागरिक करत असतात. यावर बोलताना आमदार भीमराव केराम यांची जीभ घसरली. मंत्रालयात काम असते, तेथे वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचे काम मी करतो, गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? असे केराम म्हणाले. या वक्तव्यावरून केराम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपने नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदार संघातून विद्यमान आमदार भिमराव केराम यांना उमेदवारी दिली आहे. सध्या त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती, त्यानंतर सोमवारी पंकजा मुंडेही त्यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. किनवट विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात भाजपकडून भीमराव केराम तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रदिप नाईक हे निवडणूक लढवत आहेत.केराम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी मुका घेण्याचं केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. शिवाय त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ ही सध्या व्हायरल होत आहेत.