Nitesh Karale brutal beating : वर्ध्यातील मांडवा गावात मतदान करून परत जात असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना मारहाण करण्यात आली. कराळे मास्तरांनी भाजप कार्यकर्त्यांवर मारहाण केल्याचा आरोप केला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण झाल्यानंतर कराळे मास्तरांनी वर्ध्याच्या सावंगी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मतदानाच्या दिवशी कराळे मास्तर मतदान करून मांडवा गावातून परत येत असताना, उपसरपंच सचिन कोसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारहाण करत असताना,त्यांनी कराळे मास्तरांना शिवीगाळ देखील केली. तसेच त्यांची कॉलर पकडली. व्हिडीओत कराळे मास्तर हे संतापाने सांगताना दिसतात की,‘तुम्हाला मला मारहाण करण्याचा कोणताही अधिकार नाही,परंतु तरीही तुम्ही मला शिव्या देखील देत आहात.’
या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना,नितेश कराळे मास्तर म्हणाले की,‘मी शांतपणे मतदान करून चाललो होतो. मी एकही शब्द बोललेलो नाही,पण अचानक एक व्यक्ती माझ्या अंगावर आला. त्याने मला आईवरून शिव्या देण्यास सुरुवात केली आणि कॉलर पकडली. भाजपच्या लोकांनी पोसलेली ही काही लोकं आता खूप माजली आहेत, त्यांनी हे कृत्य केलं.’ कारले मास्तरांना मारहाण झाल्याच्या या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कराळे मास्तर हे आपल्या शिक्षणाचे माध्यम बनवून लोकांच्या प्रश्नांवर व्यक्त होतात. त्यांच्यावर अशाप्रकारे हल्ला झाल्याने अनेकांच्या मनात सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होत आहेत.
नितेश कराळे हे वर्ध्यातील प्रसिद्ध शालेय शिक्षक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत. पुण्यात जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना यश मिळालं नाही,त्यामुळे त्यांनी आपल्या सारख्या होतकरू मुलांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी क्लास सुरू केला. त्यांच्या क्लासला'पुणेरी पॅटर्न'असं नाव देण्यात आले,पण त्यांची गावरान व वऱ्हाडी शैली अधिक लोकप्रिय झाली. त्यांची शिकवण्याची शैली रंजक असून,ती कोविड काळात ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून सर्वदूर पसरली.
नितेश कराळे यांना सगळेच कराळे मास्तर म्हणतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यांना लाखो व्ह्यूज देखील मिळतात. कराळे मास्तरांनी सरकारच्या धोरणांवर,महागाईवर आणि बेरोजगारीवर आवाज उठवला. कराळे मास्तरांचे विचारही लोकांना आवडले,आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र,त्यांना तिकिट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. मारहाण प्रकरणामुळे कराळे मास्तर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.