भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर वातावरण तापलं असतानाच खोत यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर अभद्र शब्दात टीका केल्याने आता ते चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यावरील वक्तव्यानंतर चहूबाजुंनी होत असलेल्या टीकेनंतर खोतांना दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहे. डुकराला कितीही साबण लावला, शाम्पू लावला तरी ते घाणीत जात असतं.
सदाभाऊ खोत म्हणाले की, संजय राऊत यांनी आम्हाला कुत्र्याची उपमा दिली पण कुत्रे हे इमानदार असतात ते धन्याची राखण आणि संरक्षण करतात. त्यांना गावगाडा माहिती नाही. त्यामुळे राखण करणारा कुत्रा म्हणजे काही माहित नाही. पण तुम्ही २०१४ ला नरेंद्र मोदी यांचा फोटो गळ्यात अडकवून मताचा जोगवा मागत फिरला. २०१९ लाही भाषण करत होता मात्र सत्तेत आल्यावर तुम्ही पहिला खंजीर हातात घेतला. कुत्र्याएवढा जरी इमानदारपणा असता तर महाराष्ट्राने तुमचं कौतुक केलं असतं. मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही. कारण डुकराला कितीही साबण- शाम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जातं.', अशी टीका सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर केली आहे. यानंतर आता सदाभाऊ चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य हे दुर्देवी आहे. भाजपने स्तर किती खाली नेला याचे द्योतक आहे. भाजपने अशी वक्तव्ये करणारे डॉग स्कॉड बाळगले आहे. खोतांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस याचे समर्थन आहे का, याचा त्यांनी खुलासा करावा अशी मागणीदेखील जयंत पाटील यांनी केली. सदाभाऊंच्या वक्तव्यांवर महाराष्ट्रातील जनता भाजपला प्रायश्चित घेण्यास भाग पाडेल. भाजप मधील काही लोक शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करून आमदारकी मिळवत असतील तर भाजपचा विचार त्यांना लखलाभ, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.