NCP Sharad Pawar Group candidate List : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ९ उमेदवारांना संधी दिली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने ६७ उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत शरद पवार गटाकडून ७६ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या तिसऱ्या यादीतून परळीत धनंजय मुंडेंविरोधात उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. तर, अणुशक्तीनगरमधून नवाब मलिकांच्या मुलीविरोधात अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला संधी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आत्तापर्यंत ८० उमेदवारांची घोषणा केली असून काँग्रेसनेही उमेदवारांच्या ३ याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादीकडून ७६ जणांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीची घोषणा केली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत माळशिरसमधून अखेर उत्तम जानकर यांना संधी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीत बहुप्रतिक्षित पिंपरी चिंचवड, परळी आणि अनुशक्तीनगरधील उमेदवार जाहीर झाले आहेत. परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आला आहे. राजेसाहेब देखमुख सद्या बीड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. तर दुसरीकडे, नवाब मलिक यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहद अहमद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या