Nagpur News : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मात्र, या मतदाना दरम्यान, काही ठिकाणी वादावादी, भांडणे झाली. अशीची एक घटना नागपूरमध्ये देखील घडली आहे. मतदान झाल्यावर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंगरूममध्ये नेण्यात येणाऱ्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. काही जणांनी या गाडीवर हल्ला करून वाहनाची तोडफोड केली आहे. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक २६८ जवळ संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
नागपूर जिल्ह्यात देखील मतदान पार पडले. हे मतदान शांतेतपार पडले. मात्र, संध्याकाळी एक घटनेने मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक २६८ मधून संध्याकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येथील ईव्हीएम मशीन हे एका मोटारितून निवडणूक अधिकारी घेऊन जात होते. या मशीन स्ट्रॉंगरूममध्ये नेण्यात येणार होत्या. ही गाडी मतदान केंद्रातून बाहेर पडली तेव्हा काही अज्ञात हल्लेखोरांनी या गाडीवर हल्ला करत दगडफेक केली. दरम्यान, या हल्ल्यात गाडीचे नुकसान झाले. आयवेळी काही स्थानिक नागरिक व भाजप कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केलं.
मात्र, पोलिस येईपर्यंत हल्ले खोरांनी गाडीवर लोखंडी रॉड आणि दगडांनी हल्ला करत तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी येत येथील कर्मचारी आणि ईव्हीएम मशीन सुरक्षितपणे ताब्यात घेतले. कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यानंतर ही गाडी पोलिस ठाण्यात आणली. व गाडीतील मशीन सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर कोतवाली पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येनं भाजप व काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये येत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत केले. काँग्रेसने ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या या गाडीची तोडफोड केली आहे, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.