Item song in Eknath shinde sabha : राज्यात निवडणुकीचे वारे वाहत जोरदार वाहत असून दिवाळीनंतर आता प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुर्ल्यातून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारार्थ पहिली सभा घेत एकनाथ शिंदे यांनी आज प्रचाराचा श्रीगणेशा फोडला. या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला मात्र ही सभा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच सभेची सुरुवात आयटम साँगने करण्यात आल्याने सध्या याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची यंदाच्या विधानसभेसाठी ही पहिलीच जाहीर सभा होती.
या आयटम साँगचा व्हिडिओ ठाकरे गटाने सोशल मीडियावर शेअर करत टीका केली आहे.शिंदे गटाच्या कुर्ला विधानसभा उमेदवारचा तथाकथित जनहित प्रचार! महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित करणारे!!! असे म्हणत ठाकरे गटाने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. आयटम साँग मधील गाण्याचे बोल भोजपुरी असल्याचे ऐकू येत आहे. सभेच्या ठिकाणी महिलांची गर्दीही लक्षणीय असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे.
२३ नोव्हेंबरला अॅटम बॉम्ब फुटणार, असं भाकीत एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राज्यात येत्या २० तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या दिवशी महायुतीच्या सर्वाधिक जागा जिंकून येणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुंबईतील ही पहिलीच प्रचारसभा आहे. त्याचा मान आपल्या कुर्ला विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे. फटाके फुटत आहेत. दिवाळी आहे. काही ठिकाणी लवंगी फटाके आहेत. पण आपला २३ तारखेला अॅटम बॉम्ब फुटणार, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
दरम्यान कुर्ल्यातील आमदार मंगेश कुडाळकर यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. मुरजी पटेल शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत.
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्ष म्हणतात लाडकी बहीण योजना बंद करू. तुम्ही त्यांना काय उत्तर देणार? ते नागपूर खंडपीठात गेले, मुंबई हायकोर्टात गेले पण त्यांची ही योजना बंद करण्याची त्यांची याचिका फेटाळण्यात आली. आमच्या कल्याणकारी योजना बंद करण्याचा खोडा घालणाऱ्यांना तुम्ही जोडा दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थित महिलांना केले.