Election Commission of India: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून राजकीय पक्षांकडे आता फक्त चार दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे.राज्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू करण्यात आली. तेव्हापासून पोलीसही अलर्ट मोडवर आहेत. राज्यात आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली, यात रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तू यासह विविध गोष्टींचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या असून आतापर्यंत ५३६ कोटींहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली. दरम्यान, १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक आयोगाच्या सीव्हिजिल अॅपच्या माध्यमातून सहा हजारांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथक तपास करून योग्य ती कारवाई करते.
१५ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या कारवाईत विविध राज्य आणि केंद्रीय यंत्रणांनी ५३६.४५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, ज्यात अवैध रोकड, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देऊ नये, यासाठी जप्ती करण्यात आली आहे. एमसीसी हा निवडणूक आयोगाने तयार केलेला मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच आहे, ज्यात राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक प्रचार आणि मतदानादरम्यान कसे वागले पाहिजे, याची रूपरेषा दिली आहे.
स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे. एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, आचारसंहिताच्या उमेदवार आणि राजकीय पक्षांनी कोणकोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे, यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.