Buldana Bus Fire: बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर बसला आग लागल्याने २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणाच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
बुलढाणा बस दुर्घटनेसंदर्भात ट्वीट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.”
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली."
संबंधित बातम्या