मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बंडखोर आमदार निलंबनाच्या मागणीविरुद्ध शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
ठाकरे Vs शिंदे संघर्ष चिघळणार
ठाकरे Vs शिंदे संघर्ष चिघळणार
26 June 2022, 21:45 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 21:45 IST
  • महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेतील अंतर्गत वाद आता न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचला आहे. यावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुंबई – शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीचा परिणाम संपूर्ण राज्य अस्थिरतेच्या गर्तेत ढकलल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेतील अंतर्गत वाद आता न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवण्याच्या निर्णयावर ते कायदेशीर मत घेऊन त्यांनी  न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.  उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या विनंतीवरून विधानसभेच्या उपसभापतींनी शिंदे यांची या पदावरून हकालपट्टी केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उपसभापतींनी किमान सात दिवसांची नोटीस द्यायला हवी होती, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

 शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या गटानेदेखील आक्रमक भूमिका घेऊन न्यायालयात धाव घेतली असून आमदारांच्या निलंबनाची मागणी आणि गटनेता बदलण्याला विरोध दर्शविला आहे. शिंदे गटाने दाखल केलेल्या या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. याच मागणीची दखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली असून कारवाई का करु नये याबाबत उत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच शिवसेनेने आपला गटनेता बदलून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना नियुक्त केले आहे. याविरोधातच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच याचिका दाखल करत या दोन्ही निर्णयांना विरोध केला आहे. याबाबत उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळ आता न्यायालय काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदार गुवाहाटी हॉटेलमध्ये आपली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक होत आहे, ज्यामध्ये पुढील रणनीती आणि कायदेशीर पैलूंवर चर्चा केली जाऊ शकते. शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या उपसभापतींच्या निर्णयाला एकनाथ शिंदे गट सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकते, असे वृत्त एएनआयने दिले आहे. 

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना विधानसभा सचिवालयातून हटवून अजय चौधरी यांना विधिमंडळ पक्षनेते बनवण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केली होती. गुरुवारी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेची विनंती मान्य करत शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांच्या नावाला मंजुरी दिली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नरहरी झिरवळ यांना हटवण्याची मागणी केली होती.

अजय चौधरी यांनी दावा केला होता, की २५ आमदारांनी शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांच्या नियुक्तीला पाठिंबा दिला आहे. अजय चौधरी शिवडी, मुंबईचे आमदार आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे खास मानले जातात. शिवडीतून ते दोन वेळा आमदार राहिले आहेत. यापूर्वी  २०१५  मध्ये त्यांना शिवसेनेने नाशिकचे जिल्हाप्रमुख केले होते.