Thane news : पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर काही राजकीय नेत्यांबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडियावर पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या ठाण्यातील एका पोलिसाची पदावनती करण्यात आली आहे. रँकनुसार हवालदार असलेल्या या पोलिसाने व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन्ही नेत्यांबदल एक आक्षेपार्ह पोस्ट केल्याने एका वर्षासाठी कॉन्स्टेबल पदावर त्यांची पदावनती करण्यात आली आहे.
ठाण्यातील एका पोलिसाने ३ जुलै रोजी सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट केली. यानंतर त्यांच्यावर चौकशी बसवण्यात आली होती. या चौकशीत हा अधिकारी दोषी आढळला आहे. त्याने पोलिस सेवेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी या अधिकाऱ्याची एक वर्षासाठी कॉन्स्टेबल पदावर पदावनती करण्याचा आदेश दिले आहेत. ही शिक्षा कारवाई करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या कौटुंबिक परिस्थितीवर प्रभाव पडणारी ठरली आहे.
पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार, संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस सेवा नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच एक पोलिस कर्मचारी असतांना तटस्थ राहणे गरजेचे असतांना त्याने तसे न केल्याने त्याची पदावनत करण्यात आली.
याच प्रकारे अशीच कारवाई पश्चिम बंगाल पोलिसांनी केली होती. एकाने भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर चुकीची पोस्ट केल्यामुळे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णनगर पोलिसांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, खोट्या बातम्यांचा उद्देश सरन्यायाधीश यांची बदनाम करणे असून यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का पोहोचला आहे. कृष्णगंज जिल्ह्यातील फुलबारी येथील रहिवासी असलेल्या सुजित हलदर असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात सायबर गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, न्यायपालिकेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध शक्य तितक्या कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.