महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला. महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला.काँग्रेसने १०१ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचे अवघे १६ उमेदवार विजय़ी झाले.या दारुण पराभवानंतर काँग्रेस अंतर्गत वादाचे फटाके फुटू लागले आहेत. आता काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यानंतर आता काँग्रेसमधूनच पटोले यांना उघडपणे विरोध होऊ लागला आहे.
विधानसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षातंर्गत मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसला विदर्भात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. नाना पटोले केवळ २१२ मतांच्या कमी फरकाने विजयी झाले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष ठरला होता. त्यानंतर विधानसभेलाही काँग्रेसकडून चांगल्य़ा कामगिरीची अपेक्षा होती. मात्र राज्यातील सर्वचत विभागात काँग्रेसची पिछेहाट झाल्य़ाचे दिसून आले आहे. लोकसभेला विदर्भात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे विधानसभेला विदर्भातील ६२ जागांपैकी महाविकास आघाडी आणि काँग्रेसला मोठे यश मिळेल अशी आशा होती, मात्र महायुतीने काँग्रेस, महाविकास आघाडीचा पार सुपडासाफ केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही महाआघाडीतून बाहेर पडण्य़ाचे संकेत दिले आहेत. आता काँग्रेसमध्येही वाद उफाळून आला असून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
नागपूरमधील काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवर खळबळजनक आरोप केला आहे. नाना पटोले हे संघाचे एजंट असल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला आहे. आरएसएस मुख्यालय परिसरात प्रियांका गांधींचा रोड शो असताना सुद्धा नाना पटोले यांच्या इशाऱ्यावर संघटनेने मदत केली नसल्याचा आरोपही बंटी शेळके यांनी केला आहे. मला राहुल गांधींनी थेट उमेदवारी जाहीर केली होती. असे असताना नाना पटोले यांनी संघटनेला माझ्या प्रचारापासून दूर राहण्याची सूचना केल्याचा होती,असा गंभीर आरोप बंटी शेळके यांनी केली.