Devendra Fadnavis Oath Ceremony : मुंबई येथे गुरुवारी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या भव्यदिव्य सोहळ्यात देशभरातून मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, या कार्यक्रमाचे नियोजनात ढिसाळपणा असल्याचा आरोप शिंदे गटाने केला. तर काही निमंत्रितांनी त्यांना गुजरातवरून आणलेल्या जुन्या पाण्याच्या बॉटल्स दिल्याची तक्रार आयोजकांकडे केली.
या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. दरम्यान, निमंत्रितांना राजकोट येथील 'मॅनिफेस्ट द चेंज' या ट्रेट्रापॅक कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या होत्या. या अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत ६९ रुपये होती. मात्र, या बॉटल्स कालबाह्य झाल्या होत्या. हे टेट्रापॅक ५ एप्रिल २०२२ मध्ये पॅक करण्यात आले होते. तर त्याची मुदत ही १९ ऑक्टोबर २०२४ ला संपली होती. असे असतांना या बाटल्या या सोहळ्याला आलेल्यांना वितरित करण्यात आल्या. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काही जणांनी तर ही बाब आयोजकांच्या निदर्शनास आणून दिली, व कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, कार्यक्रमात योग्य आदर न मिळाल्याच्या कारणावरून देखील शिंदे गटाच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली. पावसकर म्हणाले, सगळे मुख्य नेते मागे बसले होते. तिन्ही पक्षांना पासेस मिळणार होते. मात्र, जे पासेस मिळाले ते थोडे होते. या शपथविधी सोहळ्यात ढिसाळपणा जाणवला. मुख्य स्टेजवर आमचे एक केंद्रीय मंत्री होते. मात्र, पक्षाचे नेतेमंडळी असते तर बरं झालं असतं. व्यासपीठावर आमचे काही नेते असायला हवे होते’, असं किरण पावसकर म्हणाले. दरम्यान, ही चूक राज शिष्टाचार प्रशासनाकडून झाली आहे. याची दखल घ्यावी लागणार आहे. या बाबत आज तक्रार करणार नाही, पण नंतर या प्रकरणी जाब विचारणार आहोत, असं पावसकर माध्यमांशी बोलतांना म्हणाले.
मुंबईतील मोठ्या प्रमाणात उकाडा होता. गुरुवारी देखील तापमान अधिक होते. या उकड्याचा परिणाम शपथविधी सोहळ्यावर जाणवत होता. सभा मंडपात पंखे लावण्यात आले नव्हते. त्यामुळे आलेले पाहुणे घामाघुम झालेले होते. प्रवेशिकांच्या साह्याने पाहुणे मंडळी वारा घेऊन उकड्या पासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. या सोबतच शपथविधी समारंभाच्या प्रवेश पासवर कोणत्या प्रवेशद्वारातून प्रवेश करावयाचा आहे, याचा उल्लेख होता. मात्र, प्रत्यक्षात मैदानावर आलेल्या सर्व लोकांना प्रवेश पासची विचारणा करण्यात आली नाही. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती.
संबंधित बातम्या