Maharashtra Teacher Pension: महाराष्ट्रातील शिक्षक पेन्शनसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली. आता १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन मिळणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याशिवाय, राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची वेळ आधीप्रमाणेच म्हणजेच सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली. याचबरोबर शिक्षक,संस्थाचालकांचे इतर प्रश्नही तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करू, असे अश्वासनही त्यांनी दिले.
राज्यातील महायुतीच्या सरकारने शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा दिला. तसेच २००५ आधीच्या शिक्षकांना देखील न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू तसेच शिक्षकांना आणि शैक्षणिक संस्थांना भेडसावणारे प्रश्न नक्की सोडवू असे एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.
“शिक्षक हा माणसाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा घटक असतो. त्यामुळे राज्यकर्ते म्हणून त्यांचे प्रश्न सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून आजवर जुनी पेन्शन योजना असो, २० टक्के वाढीव निधी देण्यासाठी ११६० कोटींची तरतूद करणे असो, वैद्यकीय बिल आणि पेन्शनसाठी १५०० कोटींची तरतूद करणे असो किंवा २००५च्या आधीच्या शिक्षकांचा प्रश्न सोडवणे असो हे सर्वच प्रश्न या सरकारने हाती घेऊन सोडवले आहेत.आई- वडीलांनंतर महत्व हे त्याच्या शिक्षकाला असते. त्यामुळे शिक्षकांना उतरत्या वयात सुरक्षित वाटावे यासाठी आम्ही त्यांना जुनी पेन्शन योजना मंजूर करून दिली. यापुढे देखील शिक्षकांचे सर्व प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवू अशी ग्वाही शिंदेंनी दिली. याशिवाय, राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची वेळ आधीप्रमाणेच असेल”, असेही ते म्हणाले.
राज्यातील कोणताही युवक बेरोजगार राहणार नाही यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, कौशल्य विकास योजना तसेच स्टार्टअप सारख्या योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी ५ हजार मुलांना प्रशिक्षण दिले जात असून त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून नुकताच जर्मनीमध्ये चार लाख रोजगार उपलब्ध होण्यासाठीचा शासन स्तरावर करार करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या