Eknath Shinde News: कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरूवारी (०८ ऑगस्ट २०२४) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत नाट्यगृहाचे बहुतेक साहित्य जळून भस्मसात झाले आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा उघड्या डोळ्यात देखत बेचिराख झाल्याचे दुःख नाट्यप्रेमींना आहे. या आगीच्या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ही वास्तू पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आवश्यक खर्चाची तरतूद सरकारकडून केली जाईल, असे ते म्हणाले. या घटनेची संपूर्णपणे चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे राहणार
या आगीच्या घटनेवर दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग अत्यंत वेदनादायी आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. या घटनेमुळे राज्यातील कलाप्रेमी दुःखी झाले आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेली ही ऐतिहासिक वास्तू अनेक दर्जेदार कलाकृती आणि कलाकारांच्या सादरीकरणाची साक्षीदार होती. केशवराव भोसले यांची आज जयंती आहे. मात्र, त्याच्या एक दिवसअगोदर ही दुर्घटना घडणे वेदनादायी आहे. ही वास्तू पुन्हा एकदा दिमाखात उभी राहील आणि येथे कलाकृती सादर होत राहतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक हानी
कोल्हापूरला कलेचा वारसा आहे. अनेक कलाकार येथे घडले, त्यांच्या आठवणी वास्तूशी जोडलेल्या होत्या. त्यामुळेच ही वास्तू आगीत भस्मसात होणे, ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक हानी आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. येथील कलेच्या वास्तू, कलाकार आणि कला या साऱ्याची जपणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
केशवराव भोसले नाट्यगृहाला नेमके कशामुळे आग लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला खासमैदानावरील लाकडी स्टेजला लागली. त्यानंतर ही आग केशवराव भोसले नाट्यगृहात शिरली. नाट्यगृहामध्ये लाकडी बांधकाम करण्यात आल्याने आग झपाट्याने पसरली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, महापालिकेच्या आयुक्त के. मंजू लक्ष्मी, वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे नागरिकांतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.