Dhangar Rreservation: धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकार कोणती पावलं उचलणार? एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Eknath Shinde On Dhangar Rreservation: धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला.
Maharashtra News: धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. धनगर समाजाला तातडीने आरक्षण देण्याची मागणी करत आज सकाळी सातारा जिल्ह्यात धनगर बांधवांनी महामार्गावर मेंढ्या आणि खेचरांसह रास्ता रोको आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षणावर भाष्य केले. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार नेमके कोणती पावले उचलणार आहे? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
ट्रेंडिंग न्यूज
एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी धनगर आरक्षणाबाबत माहिती देत एकनाथ शिंदे म्हणाले की, "धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह धनगर समाजाचे नेते उपस्थित होते. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलणार", असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, "ज्या राज्यांमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी अभ्यास केला जात आहे, तिथे धनगर समाजातील सदस्यांसह एक शिष्टमंडळ पाठवण्याची आमची योजना आहे. समितीचा अहवाल अॅटर्नी जनरलकडे पाठवण्यात येणार असून त्यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. या प्रक्रियेत काही अडथळा असल्यास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात येईल."
"आमच्या सरकारने धनगर समाजाच्या नेत्यांना आश्वासन दिले आहे की, त्यांच्यासाठी असलेल्या योजना, एसटी समुदायांप्रमाणेच प्रदान केल्या जातील आणि सक्रियपणे अंमलात आणल्या जातील. तसेच नुकत्याच झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवरील खटले माफ केले जातील", असेही एकनाथ शिंदे म्हणाले.