मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: ‘शेतकरी भावांनो…’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना भावनिक साद

Eknath Shinde: ‘शेतकरी भावांनो…’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना भावनिक साद

HT Marathi Desk HT Marathi
Aug 23, 2022 01:48 PM IST

Eknath Shinde appeals to farmers: शेतकऱ्यावर नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं, अशी भावनिक साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घातली.

Maharashtra Chief Minister Eknath Shinde
Maharashtra Chief Minister Eknath Shinde (Rahul Singh)

महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. परंतु नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं, अशी भावनिक साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घातली. अतिवृष्टीनंतर राज्यातला शेतकरी सध्या अडचणीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांना आर्थिक मदत याविषयी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी आज पत्रस्वरूप उत्तर दिले. (Eknath Shinde appeals to farmers)

मुख्यमंत्री म्हणाले, ‘घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची, देशाची भूक भागवण्याचंही काम करताहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं, तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात... हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं....वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय....’

शेतकरी भावांनो, आत्महत्या करू नका..

लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे... तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की 'रडायचं नाही, लढायचं....' शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका... आत्महत्या करू नका... मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं.

मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा... जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या