Ladki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडेल, असा दावा विरोधकांकडून वारंवार करण्यात आला. यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींबाबत महायुतीचे सरकार काय निर्णय घेईल? याकडे सपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लाडकी बहिण योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हेतर, लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असेही त्यांनी म्हटले.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. लाडक्या बहिणींबाबत प्रश्न विचारले असता फडणवीस म्हणाले की, 'आमच्या सरकारने जनतेला दिलेली सर्व आश्वासन पूर्ण केली जातील. मात्र, त्यासाठी जी व्यवस्था करावी लागते, ते आधी करू. निकषाच्या बाहेर कोणी असेल किंवा तशा तक्रारी आल्या तर पुनर्विचार केला जाईल. गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली शेतकरी सन्मान योजनेत मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो, असे लक्षात आले. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आम्ही निकषात बसत नाही, असे सांगितले. यामुळे जर लाडकी बहीण योजने काही महिला निकषाच्या बाहेर असतील, त्यांचा पुनर्विचार केला जाईल.' तसेच लाडकी बहीण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचे कारण नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे. या निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. याशिवाय, २१ ते ६० वयोगटातील वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलेच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. परंतु, राज्यात लाडक्या बहिणींच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागा जिंकता आल्या. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिंदे गटाला ५७ जागा, अजित पवार गटला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार गटाने १० जागेवर विजय मिळवला.
संबंधित बातम्या