विधानसभा निकालाच्या ११ दिवसानंतर गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींसह जवळपास २० राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमासाठी होणारी मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेता सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यासाठी ५०० अधिकारी व जवळपास साडे तीन हजारांहून अधिक पोलीस कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.
देवेंद्र फडणवीसांची आजच विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री तसेच दोन उपमुख्यमंत्री उद्या शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.या सोहळ्याला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने आझाद मैदान व आसपासच्या परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या परिसराभोवती व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ पोलीस उपायुक्त आणि २९ सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ५२० पोलीस अधिकारी आणि साडेतीन हजार कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.
शपथविधी सोहळ्यादरम्यान वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त,तीन पोलीस उपायुक्त, ३० पोलीस अधिकारी आणि २५० इतर कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त एसआरपीएफ, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक देखील असणार आहेत.
या शपथविधीसाठी महायुतीचे घटक पक्ष भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांची मोठी गर्दी असणार आहे. राज्यभरातून भाजपाचे ४० हजार कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान मोदी, भाजपचे केंद्रातील ज्येष्ठ नेते, व्हीव्हीआयपी-व्हीआयपी व्यक्तींसह अगदी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.यासोबतच विभिन्न धर्मीय संत – महंतांसह जवळपास २ हजार व्हीव्हीआयपी लोकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी केलं आहे. यात आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. हे बदल दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहणार आहेत.
संबंधित बातम्या