मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज खेडमध्ये जाहीर सभा, उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज खेडमध्ये जाहीर सभा, उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 19, 2023 09:17 AM IST

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज संध्याकाळी खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde (HT_PRINT)

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (१९ मार्च २०२३) रत्नागिरीच्या खेडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहेत. माजी मंत्री रामदास कदमांनी या सभेचे आयोजन केले असून या सभेला सायंकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेऊन एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार घणाघात केला. यामुळे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या टीकेला कोण प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी (५ मार्च २०२३) रत्नागिरीच्या खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गमवल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा होती. उद्धव ठाकरे यांच्या या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.

“ज्यांना जे शक्य होतं ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले आहेत. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. मला तुमची साथ हवी. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला एक सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय?” असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

“मी घरात राहून, जसा महाराष्ट्र संभाळला, तो तुम्ही घरोघरी अगदी गुवाहाटीला फिरून संभाळू शकत नाही. तुमचे अर्ध आयुष्य दिल्लीत मुजरे मारण्यात गेले. उरलेले आयुष्य हे ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यांना संभाळताना जातंय. महाराष्ट्रातील सगळे उद्योगधंदे गुजरातला जात होती. कारण, गुजरातच्या निवडणुका येणार होत्या. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार कधी ऐकलेही नाहीत, ते आम्हांला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? काय आहेत बाळासाहेबांचे विचार? नोकर्‍या जाऊ द्या हे विचार नव्हते, भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्‍या शिवसेनेचा विजय असो हा विचार घेऊन शिवसेनेची स्थापना झाली”, असंही उद्धव ठाकरे म्हणत होते.

या सभेत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवरून शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे आजच्या सभेत एकनाथ शिंदे नेमकं कोणत्या भाषेत आणि मुद्द्यावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर देतील? हे लवकरच स्पष्ट होईल.

IPL_Entry_Point