'महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड-घोटाळा…' राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड-घोटाळा…' राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर…

'महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड-घोटाळा…' राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर…

Published Feb 07, 2025 04:33 PM IST

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा थेट आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या आरोपांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

राहुल गांधींच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा करून मतदार यादांमध्ये नवीन नावे समाविष्ट करण्यात आली. विधानसभेपूर्वी मतदार याद्यांमध्ये तब्बल हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे मतदार अधिकचे टाकण्यात आल्याचा खळबळजनक आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. 'जब एक ही चुटकुला बार बार सुनाया जाए, तो उसपर हँसा नही करते' असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनाही टॅग केले आहे. राहुल गांधी यांचे दावे निराधार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेचा निकाल लागत असून निकालापूर्वी रचल्या जात असलेल्या कथानकाचा हा भाग असल्याचे म्हटले आहे.

नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतदार नोंदणी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज, शुक्रवारी नवी दिल्लीत भरगच्च पत्रकार परिषदेत केला होता. अवघ्या पाच महिन्यांत राज्याच्या मतदार यादीत ३९ लाखांहून अधिक मतदारांची भर पडल्याचा दावा राहुल यांनी केला होता. नवीन नोंदवलेल्या मतदारांच्या वैधतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या कालावधीत नोंदणी केलेल्या मतदारांची एकूण संख्या हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण मतदारांपेक्षा जास्त असल्याचे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी-शरद पवार या आघाडीला निवडणुकीत अनेक ठिकाणी घोटाळा झाल्याचं आढळून आलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

२०१९ ची विधानसभा निवडणूक आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक या दरम्यान ५ वर्षांच्या काळात एकूण ३२ लाख मतदार जोडले गेले. मात्र, लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना-ठाकरे गट आणि राष्ट्रवादी-शरद पवार या पक्षांना विजय मिळवला होता. लोकसभा २०२४ ची लोकसभा आणि त्यानंतरची विधानसभा निवडणूक या दरम्यान ३९ लाख मतदारांची भर पडल्याचे राहुल गांधी म्हणाले. हे ३९ लाख मतदार कोण आहेत, असा प्रश्न त्यांनी केला. ही संख्या हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारसंख्येएवढी आहे. राज्यातील एकूण मतदानापेक्षा महाराष्ट्रात मतदारांची संख्या जास्त का आहे?, महाराष्ट्रात अचानक एवढे मतदार तयार झाले? या प्रश्नांची निवडणूक आयोगाने उत्तरे द्यावी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेस नेते आत्मपरीक्षण करत नाहीः देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले आहे. काँग्रेस नेते आत्मपरीक्षण करत नाहीत असे ते म्हणाले. ‘निवडणूक आयोगाने सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिली आहेत. ८ फेब्रुवारीच्या दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस पक्ष दिल्लीत कुठेही दिसणार नाही हे माहित असल्याने राहुल गांधी 'कव्हर फायर’ करत आहेत. म्हणूनच त्या दिवशी ते काय बोलतील, नवीन कथानक कसे तयार करतील, यासाठी ते सराव करत आहेत. जर राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण केले नाही आणि खोटे बोलून स्वत:चे सांत्वन करत राहिले तर त्यांच्या पक्षाचे पुनरुज्जीवन शक्य नाही. राहुल गांधी यांनी आपल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.

 

Haaris Rahim Shaikh

TwittereMail

हारीस शेख हे हिंदुस्तान टाइम्स -मराठीचे संपादक आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स (ऑनलाइन)चे संपादक म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी मटा (ऑनलाइन)चे दिल्ली प्रतिनिधी, ईटीव्ही -मुंबई ब्युरोमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले. टिव्ही, प्रिंट आणि डिजिटल न्यूज माध्यम क्षेत्रात २३ वर्ष काम करण्याचा अनुभव. राजकारण, अर्थजगत, आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर नियमित लिखाण.

Whats_app_banner

संबंधित बातम्या