मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तुम्ही नंतर बोला, मी आधी बोलतो; बावनकुळेंनी पंकजा मुंडेंना भाषण करण्यापासून रोखलं? व्हिडिओ व्हायरल
Chandrashekhar Bawankule and Pankaja Munde Viral Video
Chandrashekhar Bawankule and Pankaja Munde Viral Video

तुम्ही नंतर बोला, मी आधी बोलतो; बावनकुळेंनी पंकजा मुंडेंना भाषण करण्यापासून रोखलं? व्हिडिओ व्हायरल

22 January 2023, 14:46 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Pankaja Munde's Viral Video: महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना मंचावरून बोलू न दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे मागील अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना सतत पक्षाकडून डावललं जात असल्याचा दावा, विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेकदा केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा बीड दौरा केला. पण दोन्ही वेळा पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला गैरहजर होत्या. यामुळे त्या नाराज असल्याच्या राजकीय चर्चांना आणखी जोर मिळतोय. यातच भाजप प्रेदशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना भाषण करताना रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंकजा मु्ंडे मंचावर भाषण करण्यासाठी आल्या. पण बावनकुळेंनी त्यांना बोलू दिले नाही. त्यावेळी पंकजा मुंडें बावनकुळेंना ‘मला दोन मिनिटे बोलू द्या’, अशीही विनंती करताना दिसत आहेत. मात्र, त्यानंतरही बावनकुळेंनी ‘आधी मला बोलू द्या, तुम्ही नंतर बोला’, असं म्हटलंय.या संवादानंतर पंकजा मुंडे आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसनं आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “जे स्वतःच्या पक्षातील एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलू देत नसतील, तर ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील, याचा विचार न केलेलाच बरा. शेवटी काय भाजपाचे संस्कार म्हटल्यावर असंच होणार!”

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण दिले." हा पंकजा मुंडे आणि भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. माझ्या कालच्या संपूर्ण दौऱ्यात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे तुम्ही नंतर बोला, मी आधी बोलतो, असं मी त्यांना म्हटलं", अशा शब्दात बावनकुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली.