Maharashtra Cabinet : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या रविवारी १५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात होणार आहे. नवे मंत्री नागपुरातील विधीमंडळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, सुमारे ३० मंत्री उद्या शपथ घेतील. राज्य विधिमंडळाचे आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. ५ डिसेंबर रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ४३ सदस्य असू शकतात.
राज्यात विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीने मोठ यश मिळवले. निवडणूक निकाल लागल्यावर १३ दिवसांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. यानंतर मंत्रीमंडळ विस्तार रखडला होता. कुणाला किती मंत्रिपद मिळणार यावरून गेल्या दहा दिवसांपासून चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे हे काही मंत्रिमंडळावरून आग्रही असल्याने हा तिढा सुटला नव्हता. यानंतर दिल्लीत देखील बैठका झाल्या. मात्र, या बैठकांना शिंदे अनुपस्थित राहिले. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती आहे. उद्या नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मंत्रीमंडळ विस्तार होणार असून नवे मंत्री शपथ घेणार आहेत. या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ तर राष्ट्रवादीचे १० मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. हा शपथविधी सोहळा उद्या सकाळी ११ किंवा ४ वाजता होण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात सत्ताधारी आघाडीला घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर येत्या १२ जानेवारीला शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये युथ आउटरीच प्रोग्रॅम चालविण्यासह विविध अजेंड्यांवर चर्चा केली जाणार आहे. शिर्डीत दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे दहा हजारांहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. स्वामी विवेकानंद ांच्या विचारांनी प्रेरित तरुणांवर लक्ष केंद्रित करणारी नवी मोहीम या परिषदेत सुरू करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
संबंधित बातम्या