Maharashtra cabinet portfolio : मंत्रिमंडळ विस्तारापासून कुणाला कोणती खाती मिळणार याची उत्कंठा ताणली गेली होती. आता संपूर्ण महाराष्ट्राला ज्या क्षणाची आतुरता होती, तोमहाराष्ट्र सरकारच्या खातेवाटपाचा निर्णय अखेर झाला आहे. कोणाच्या वाट्याला कोणती खाती येणार? यावरुन राजकीय खलबतं सुरु होती. अखेर राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झालं असून यात अपेक्षेप्रमाणे भाजपकडे अधिक मंत्रालये गेली आहेत. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पॉवरफुल मंत्रालये आपल्याकडे खेचण्यात यश आले आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची तुलनेने कमी महत्वाच्या खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे. गृह विभागाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंनी नगरविकासवर डल्ला मारला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची धुरादेखील देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थ मंत्रिपद कायम राखण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे मागील सरकारच्या काळात शिंदे व अजित पवारांकडे असलेली जवळपास खाती यावेळीही मिळवली आहेत.
महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपने गृह, सहकार, कृषी, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा आणि ऊर्जा यासारखी महत्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. दरम्यान शिंदेसेना आणि अजित पवारांच्याय राष्ट्रवादी काँग्रेसनेही मागील कॅबिनेटमधील जवळपास सर्व महत्वाची मंत्रिपदे कायम राखली आहेत.
मुख्यमंत्रीपद हातातून निसटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी गृह मंत्रालयावर दावा केला होता. यामुळेच खातेवाटपाला विलंब झाल्याचे बोलले जात आहे. शिंदेंना गृहखाते मिळाले नसले तरी नगर विकास हे महत्वाचे खाते राखण्यात शिंदे यांना यश आले आहे. याशिवाय गेल्या सरकारमध्ये भाजपकडे असलेले गृहनिर्माण हे महत्वाचे खातेही शिवसेनेकडे आले आहे. गेल्या कॅबिनेटमध्ये भाजपचे अतुल सावे गृहनिर्माण मंत्री होते. मात्र आता गृहनिर्माण शिंदेंना दिल्यामुळे सावेंकडे ओबीसी कल्याण,दुग्धविकाससारखे कमी महत्वाचे खाते देण्यात आले आहे.
अजित पवारांनी अर्थ व नियोजन राखले आहेच त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क हे महत्वाचे खातेही मिळवले आहे. याशिवाय कृषी,वैद्यकीय शिक्षण,महिला व बालविकास ही गेल्या सरकारमधील महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे आली आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे २०१४-१९ दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री होत्या. तसेच गेल्या काही वर्षात भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस पदावर कार्यरत होत्या. त्यांना पर्यावरण व वातावरण बदल,पशुसंवर्धन सारखं खातं देऊन महिला व बालविकास अदिती तटकरेंना देण्यात आलं आहे. त्याच बरोबर अल्पसंख्यांक खातेही राष्ट्रवादीला देण्यात आले आहे. हे मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आले आहे.
मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असलेले धनंजय मुंडे यांनाअन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणविभाग देण्यात आला असून नव्या मंत्रिमंडळात माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्री पद देण्यात आले आहे.
राज्याच्या ३९ जणांच्या कॅबिनेटमध्ये भाजपचे सर्वात जास्त १९ मंत्री आहेत. मात्र काही विभाग वगळता अनेक महत्वाची मंत्रालये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आहेत. त्यातून शिल्लाक राहिलेल्या खात्यांवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बोळवण केलेली दिसते. यामध्ये पंकजा मुंडे यांना पर्यावरण, गणेश नाईक हे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री राहिलेले आहेत. त्यांना वनमंत्री केले आहे.
आशिष शेलार यांना आयटी, सांस्कृतिक कार्य मंत्रालय देण्यात आले आहे. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. मात्र त्यांना आयटी आणि सांस्कृतिक कार्य सारखे खाते देऊन सामावून घेण्यात आले आहे. मंगलप्रभात लोढा यांचे भाजपमध्ये वजन वाढले असं वाटत असताना त्यांना आहे तेच म्हणजे कौशल्य विकास, रोजगार,उद्योग व संशोधनखाते रिपीट करण्यात आले आहे. नीतेश राणे यांना मत्सविकास व बंदरे हे खाते एकत्र करून दिले आहे. कोकणातून येत असल्याने त्यांना हे पद देण्यात आल्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या