मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मंत्रिमंडळ बैठक संपली, मुख्यमंत्र्यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत काय झाला निर्णय?

मंत्रिमंडळ बैठक संपली, मुख्यमंत्र्यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत काय झाला निर्णय?

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 22, 2022 02:48 PM IST

मंत्रिमंडळ बैठकीआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरून विधान सभेची वाटचाल बरखास्तीच्या दिशेने असं ट्विट केलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फोटो - पीटीआय)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका बाजुला बंड पुकारले असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीआधी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवरून विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्विट केलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा देणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र मंत्रिमंडळ बैठक संपली असून त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे. राज्यातील राजकीय भूकंपाच्या शक्यतांची चर्चा होत असताना या बैठकीत काय होणार याकडे लक्ष लागन राहिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचे कामकाज सुरू असल्याचेच संकेत यातून दिले आहेत.

कोरोनाची लागण झाल्यानं मुख्यमंत्र्यांनी व्हर्च्युअल पद्धतीने बैठकीला उपस्थिती लावली होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाबाबत काहीच चर्चा केली नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमित कामकाजाबाबत चर्चा झाली. अकरा विषयांवर निर्णय घेऊन बैठक संपवण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे. बंडखोरीमुळे सरकार संकटात आले असले तरी याबाबत अद्याप शिवसेनेच्या नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरू आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं की, राज्य विधानसभा बरखास्त करम्याचा कोणताही विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी कमलनाथ यांना सांगितलं आहे. कमलनाथ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेवेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत एकत्र काम करेल, विधानसभा बरखास्त करणार नाही असं कमलनाथ यांना सांगितल्याचं पटोलेंनी म्हटलं.

दरम्यान, गुवाहाटीत असलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये ६ ते ७ अपक्ष आमदार आहेत. इतर आमदार हे शिवसेनेचे असून आणखी संख्या वाढत आहे असंही शिंदे यांनी सांगितलं आहे. आम्हाला भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आमची त्यांच्याशी चर्चाही सुरू नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या