मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतरही भाजपच्या अडचणी संपल्या नाहीत, एकनाथ शिंदेंनी वाढवलं टेन्शन!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतरही भाजपच्या अडचणी संपल्या नाहीत, एकनाथ शिंदेंनी वाढवलं टेन्शन!

मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतरही भाजपच्या अडचणी संपल्या नाहीत, एकनाथ शिंदेंनी वाढवलं टेन्शन!

Updated Dec 12, 2024 07:17 AM IST

Portfolio Issue: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असला तरी खातेवाटपावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत.

एकनाथ शिंदेंनी पुन्हा भाजपचे टेन्शन वाढवले
एकनाथ शिंदेंनी पुन्हा भाजपचे टेन्शन वाढवले (Hindustan Times)

Maharashtra News: महाराष्ट्रात भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले असले तरी तणाव अद्याप संपलेला नाही. निवडणूक निकालानंतर शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी बराच काळ नाराज होते. पण नंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला. आता शिंदे यांनी पुन्हा भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत. आता खातेवाटपावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. सरकारमधील सर्वात मोठे खाते मानले जात असल्याने भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना गृहखाते हवे आहे.

एनडीटीव्हीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे या बैठकीपासून स्वत:ला दूर ठेवू शकतात. या बैठकीत महाराष्ट्रातील खात्यांच्या वाटपाबाबत निर्णय होणार आहे. मागील सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, पण त्यांच्याकडे गृहखाते नव्हते. गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने गृहखाते मागील सरकारप्रमाणे शिवसेनेच्या वाट्याला यावे, अशी शिंदे यांची इच्छा आहे. मात्र, भाजपला ते सहजासहजी मान्य होताना दिसत नाही. शिवसेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खाते दिले जाऊ शकते.

खात्यांवरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष तर आहेच, पण राष्ट्रवादीच्याही अनेक मागण्या आहेत. अजित पवारही शिवसेनेसोबत समान वाटा मागत आहेत. आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याचा पक्षाचा दावा आहे. त्यांनी कमी जागा लढवल्या, पण तरीही जास्त उमेदवार जिंकले. राष्ट्रवादीला अर्थमंत्रिपद हवे आहे. मागील सरकारमध्ये हा विभाग राष्ट्रवादीकडे होता, पण यावेळी शिवसेनेलाही वित्त खाते हवे आहे. अर्थ, नियोजन आणि पाटबंधारे खाते राष्ट्रवादीच्या वाट्यालाच जाऊ शकते, असे मानले जात आहे. या सरकारमध्ये भाजपला सर्वाधिक २२, शिवसेनेला १२ आणि राष्ट्रवादीला ९ खाती मिळू शकतात.

महायुती सरकारचा काही दिवसांपूर्वी शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. २३ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या निकालात महायुती आघाडीने चमकदार कामगिरी करत २३० जागा जिंकल्या. १३२ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतिहास रचला. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या