Maharashtra Cabinet Expansion : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून बहुप्रतिक्षेनंतर आज रविवारी (दि १५) महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी नागपूर येथे पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी नागपूरमध्ये करण्यात आली आहे. संध्याकाळी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. नागपूरमध्ये मोठ्या संख्येने मंत्री शपथ घेण्याची ही पहिली वेळ नसली तरी या पूर्वी देखील नागपूरमध्ये छोटेखानी शपथविधी सोहळा पार पडला आहे.
महाराष्ट्राच्या निर्मिती पूर्वी १९५२ मध्ये वसंतराव नाईक यांचा नागपूर येथे तत्कालीन मध्य प्रांतच्या सरकारमध्ये उपमंत्री म्हणून छोटा शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या आज होणारा हा तिसरा शपथविधी सोहळा राहणार आहे. तर १९६० नंतर स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरचा हा दूसरा मोठा शपथविधी होणार आहे.
राज्य विधिमंडळाचे आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. त्यापूर्वी आज नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तिन्ही पक्षाचे काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. अनेक नेत्यांना पक्षप्रमुखांचा फोन गेला असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप अधिकृत नावे जाहीर झाले नाही. आज ३९ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. या पूर्वी ५ डिसेंबर रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज नागपुरात राजभवनात होणार आहे. नागपुरात होणारा हा पहिला शपथविधी सोहळा नाही. या पूर्वी १९९१ मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता. त्यावेळी शिवसेना फुटली होती. यावेळी छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत जात शपथ घेतली होती. त्यानंतर ३३ वर्षानंतर आज हा दुसऱ्यांदा शपथविधी सोहळा हा नागपुरात पार पडणार आहे.
१९९१ मध्ये शिवसेनेमद्धे पहिले बंड हे छगन भुजबळ यांनी केले होते. २१ डिसेंबर १९९१ मध्ये उपराजधानी नागपुरात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. यावेळी बंडखोर छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधी सोहळ्यापूर्वी दोन दिवसांपूर्वी नागपुर हिवाळी अधिवेशन सुरू असताना छगन भुजबळ व त्यांच्या ११ आमदारांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हा मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी सुधाकरराव नाईक हे १९ डिसेंबरला रात्री उशिरा नागपुरातून हिवाळी अधिवेशन सोडून दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा नागपूरला परत येत नव्या मंत्र्यांची यादी त्यावेळेचे राज्यपाल श्री सुब्रमण्यम यांना दिली होती. यानंतर २१ डिसेंबर १९९१ रोजी नागपूर येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर त्यांच्या सोबत वसुधा देशमुख, राजेंद्र गोडे, भरत बाहेकार, शंकर नम, जयदत्त क्षीरसागर व शालिनी बोरसे या सहा उपमंत्र्यांनी देखील शपथ घेतली होती.