मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे सरकारचं दिवाळी गिफ्ट! रेशनवर १०० रुपयांत मिळणार रवा, चणा डाळ, साखर आणि तेल

शिंदे सरकारचं दिवाळी गिफ्ट! रेशनवर १०० रुपयांत मिळणार रवा, चणा डाळ, साखर आणि तेल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 04, 2022 05:01 PM IST

Maharashtra cabinet decisions: दिवाळीच्या निमित्तानं आवश्यक असलेल्या चार महत्त्वाच्या जिन्नस अवघ्या १०० रुपयांत रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला आहे.

Ration
Ration

Maharashtra cabinet decisions: गॅस सिलिंडरपासून भाज्यांपर्यंत सर्वच वस्तूंच्या महागाईमुळं मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांना ऐन सणासुदीच्या दिवसात दिलासा देणारा निर्णय एकनाथ शिंदे सरकारनं घेतला आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून चार महत्त्वाच्या वस्तू अवघ्या १०० रुपयांत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर व एक किलो पाम तेल या चार वस्तू रेशन दुकानांवर अवघ्या १०० रुपयांत मिळणार आहेत. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच, सुमारे ७ कोटी लोकांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे. या निर्णयामुळं सरकारी तिजोरीवर सुमारे ५०० कोटींचा भार पडणार आहे.

शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी प्रत्येक कुटुंबाला मिळावा व त्या संदर्भात कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागानं घ्यावी, अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर निर्णय

  • आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार
  • पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार
  • नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारीत खर्चास मान्यता.
  • भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता.
  • उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा

Ashok Chavan: शिंदे सरकार मेहेरबान; काय करणार अशोक चव्हाण? पुन्हा चर्चेला उधाण

IPL_Entry_Point