मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  State Police Recruitment: राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; नवी तारीख कोणती?

State Police Recruitment: राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; नवी तारीख कोणती?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 29, 2022 04:17 PM IST

State Police Recruitment: राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.

Police Recruitment
Police Recruitment

State Police Recruitment: राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही माहिती दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी १५ दिवस अधिकचे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॉन क्रिमिलेअरच्या प्रमाणपत्राच्या संदर्भातही काही तक्रारी आल्या होत्या. मागील वर्षीचं प्रमाणपत्र यावर्षी मिळतं. त्यामुळं मागील वर्षीचं प्रमाणपत्रंही ग्राह्य धरण्यात येणार आहे. भूकंपग्रस्तांचाही यात समावेश करण्यात आला आहे. तीही अडचण दूर झाली आहे. पोलीस भरतीच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत ११ लाख ८० लाख अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली.

७५ हजार पदांच्या भरतीचा आढावा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. त्या प्रक्रियेचा आढावा देखील मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्याला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित विभागाला याचा अहवाल द्यावा लागणार आहे,' असंही फडणीवस यांनी सांगितलं.

WhatsApp channel