महाराष्ट्रात गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित; पशुपालकांना मिळणार प्रती गाय ५० रुपये अनुदान-maharashtra cabinet decision cow declared as state mother ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्रात गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित; पशुपालकांना मिळणार प्रती गाय ५० रुपये अनुदान

महाराष्ट्रात गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित; पशुपालकांना मिळणार प्रती गाय ५० रुपये अनुदान

Oct 01, 2024 01:01 PM IST

राज्य सरकारकडून आता देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे.

गाय राज्यमाता - गोमाता घोषित
गाय राज्यमाता - गोमाता घोषित

महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टिने देशी गायींच्या पालनपोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून आता देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे.

राज्यात देशी गायींच्या संख्येत झपाट्याने घसरण होत आहे. देशी गायी एचएफ गायींच्या तुलनेत कमी दूध देत असल्याने शेतकऱ्यांना चारा-पाण्याचा खर्च परवडत नसल्याने देशी गायींच्या संवर्धनाकडे पशुपालकांचा कल कमी असतो. २०१९ साली झालेल्या २०व्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात देशा गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी आढळून आली आहे. २०१२ मध्ये झालेल्या १९व्या पशुगणनेच्या तुलनेत महाराष्ट्रात गायींची संख्या २०.६९ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. देशी गायींच्या संवर्धनासाठी ‘राज्यमाता-गोमाता’ जाहीर निर्णय घेण्यात आला आहे.

गोशाळांना मिळणार प्रतीदिन, प्रती गाय ५० रुपये अनुदान

राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रती गाय प्रती दिन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल.

देशी गायीच्या दुधाचे महत्व

देशी गायीच्या दुधामध्ये ए२ प्रोटिन असल्याने शरीरासाठी चांगले मानले जाते. गायीच्या दुधात शरीर पोषणासाठी महत्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने गायीचे दूध हे पूर्णअन्न मानले जाते. देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारातील महत्व,  आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा पावर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत गायीचे शेण व मूत्राचे महत्व विचारात घेता देशी गायीच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. त्यामुळे देशी गायीला राज्यात राजमाता गोमाता असा दर्जा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील देशी गायींच्या प्रमुख ५ जाती (cow breed)

डांगी-  या जातीच्या गायी प्रामुख्याने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये आढळतात. 

देवणी -  या जातीच्या गायी महाराष्ट्रात प्रामुख्याने लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आढळतात

लाल कंधार - नांदेड आणि लातूर जिल्ह्यात आढळते.

खिल्लार - या जातीच्या गायी सोलापूर, सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात आढळतात.

गवळावू - या जातीच्या गायी प्रामुख्याने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आढळतात.

 

देशी गायीच्या दुधाला भाव द्याः दूध उत्पादक संघर्ष समितीची मागणी

 

राज्यात देशी गायीचे संवर्धन होऊन त्यांची संख्या वाढावी आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना गायी पाळण्याची प्रेरणा मिळावी यासाठी राज्य सरकारने आज गायीला 'राज्यमाता-गोमाता' म्हणून जाहीर केले. परंतु गायीला अशा प्रकारे ‘राज्यमाता-गोमाता’ संबोधल्यामुळे पशुपालकांच्या आर्थिक परिस्थितीत काहीही फरक पडणार नसल्याचं मत राज्य दूध उत्पादक संघर्ष समितीचे नेते डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केलं आहे. देशी गायीच्या दुधाला प्रती लिटर ६० रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक संघर्ष समितीने ३३ दिवस आंदोलन केलं होतं. परंतु राज्य सरकारने देशी गायीच्या दुधाला प्रती लिटर केवळ ५ रुपयांचे अनुदान जाहीर केले. सध्या राज्यात देशी गायीच्या दुधाला फक्त ३५ रुपये भाव मिळतो. राज्यात शेतकऱ्याला देशी गायीच्या दुधाला जोपर्यंत भाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी गायी पाळणार नाही. आज देशी गायीच्या दूध उत्पादकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. सत्ताधारी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे केवळ गायीचं भावनिक राजकारण करत आहे. देशी गायीच्या दुधाचे भाव वाढले तर आपोआप गायीचं संवर्धन होईल' असं मत किसान सभेचे नेते डॉ. नवले यांनी व्यक्त केलं. देशी गाय हे राज्यात लाखो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं साधन आहे. धार्मिक कारणांसाठी कुणीही देशी गाय पाळत नाही. राज्य माता गोमाता असं म्हणून देशी गायीचं संवर्धन होणार नाही, असंही नवले म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

Whats_app_banner