Maharashtra Government Scheme: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा समावेश आहे. या योजनेंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. राज्य सरकारच्या घोषणेनंतर महागाई बोजाखाली दबलेल्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाकी नऊ आले आहेत. एवढेच नव्हेतर, जीवनावश्यक वस्तूंसाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलिंडर मोफत मिळतील. एकूण ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे अजित पवार यांनी म्हटले.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा करण्यात आली. पेट्रोलवरील कर २६ टक्क्यांवरून २५ टक्के आणि डिझेलवर २४ टक्क्यांवरून २१ टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांन स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. अजित पवार म्हणाले की, मुंबई आणि आसपासच्या भागात डिझेलवरील कर २४ टक्क्यांवरून २१ टक्के करण्यात येत आहे. त्यामुळे डिझेलचे दर प्रतिलिटर २ रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय, मुंबई विभागात पेट्रोलवरील कर २६ टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आला. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ६५ पैशांनी कमी होतील.
राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल माफ करण्यात येणार आहे. याशिवाय, पीक निकामी झाल्यास नुकसान भरपाईच्या रकमेतही वाढ करण्यात आली. यापूर्वी ही रक्कम २५ हजार रुपये होते. मात्र, आता ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल या दराने आर्थिक मदत म्हणून ८५० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
संबंधित बातम्या