अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. येत्या सप्तेंबर-ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची मुदत संपत असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात चार महिन्यांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याला आठ हजार कोटींचा जीएसटी परतावा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
अजित पवारांनी साडी वितरण करण्याची महत्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. शिधापत्रिकेवर एका साडीचे वितरण केले जाणार आहे. यापूर्वी दक्षिणेतील राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रचारात साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला जातो. यामध्ये अनेक दुर्घटनाही झाल्याचे समोर आले आहे. आता राज्यातील महायुती सरकारनेही महिलांना आकृष्ट करण्यासाठी साडी वाटपाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक कुटूंबाला ३०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे. माझी वसुंधरा योजनेसाठी विशेष तरतूद केली जाणार आहे. अंगवणवाड्यांना सौर उर्जा पुरवली जाणार आहे. वीज दर सवलतीत १ वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे. सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडीची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य सरकार ४० टक्के अपारंपारिक उर्जा राबविणार आहे. ३७ हजार अंगणवाडींना सौर उर्जा दिली जाणार आहे. एक लाख महिलांना रोजगार दिला जाईल. अंगणवाडी सेविकांची १४ लाख पद भरण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. ४४ लाख नुकसान झालेल्या शेतकरी यांना तीन हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर ५ हजार पिंक रिक्षा महिलांसाठी दिल्या जाणार आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजारांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे.
अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय. या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी ७७ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.