Maharashtra Board Time Table: इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेची संभाव्य तारीख समोर आली आहे. त्यानुसार, इयत्ता बारावीची परीक्षेला ११ फेब्रुवारी २०२४ पासून तर, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. येत्या १५ दिवसांत परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा होतात. साधारणपणे मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जातो. या परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होते.
महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत मोठा बदल केला आहे. बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवणे आवश्यक आहे. परंतु, गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय अनेक विद्यार्थ्यांना अवघड जातात. मात्र, आता या दोन्ही विषयांत उतीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना ३५ गुण मिळवण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी २० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवण्यास त्याला उत्तीर्ण केले जाणार आहे. पंरतु, संबंधित विद्यार्थ्याच्या निकालावर एक विशेष शेरा देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रमाणपत्र घेऊन अकरावीत प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे, असे दोन पर्याय उपलब्ध असतील. महत्त्वाचे म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांना गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर घडवायचे नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम आहे.
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. हेरंब कुलकर्णी यांच्या मते,' महाराष्ट्र बार्डाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेला निर्णय घातक ठरू शकतो. गणित आणि विज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याऐवजी त्यांना या दोन्ही विषयांची गोडी कशी निर्माण होईल? यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु, बोर्डाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षणाचा दर्जा घसरण्याची दाट शक्यता आहे.आपल्याकडे असेही काही लोक आहेत, जे पदवीधर असूनही त्यांना साधा अर्ज देखील लिहिता येत नाही.'
संबंधित बातम्या